आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ मुख्य स्पर्धांच्या आयोजनाचा मान १४ देशांना दिला. भारताला २०२६ व २०३१ मध्ये अनुक्रमे ट्वेंटी-२० व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे संयुक्त आयोजन करण्याचा मान मिळाला आहे, तर २०२९ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार आहे. आयसीसीच्या या घोषणेत सर्वाधिक लक्ष वेधले ते पाकिस्तानला मिळालेल्या यजमानपदाचे...पाकिस्तानला २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. १९९६मध्ये त्यांनी भारत व श्रीलंका यांच्यासह संयुक्तपणे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तान भूषविणार आहे.
भारतीय संघ २०२५मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?पाकिस्तानला आयसीसी स्पर्धांचं यजमानपद मिळाल्यामुळे भारतीय संघाला तेथे जाणं भाग आहे. दोन्ही देशांतील संबंध पाहता आता टीम इंडिया २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या मुद्यावर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांच्याकडून महत्त्वाचे अपडेट्स मिळाले आहे. दोन्ही देशांमधील राजकिय संबंध ताणले गेल्यामुळे उभय संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात.
अनुराग ठाकूर यांनी सांगितले, वेळ आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल. गृह मंत्रालयाचा या निर्णयात सहभाग असणार आहे. नुकतंच काही देशांनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यामुळे २०२५मध्ये सुरक्षेची तपासणी करून निर्णय घेतला जाईल.''
२००९मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर तेथे एक दशक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही. आता २०१७नंतर २०२५ला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार, जर संघांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला, तर पाकिस्तानला यूएईत स्पर्धेचे आयोजन करावं लागेल.
जाणून घ्या कोणत्या देशांत होणार कोणती स्पर्धा
- २०२४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - वेस्ट इंडिज आणि अमेरिका
- २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी - पाकिस्तान
- २०२६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - भारत आणि श्रीलंका
- २०२७ वन डे वर्ल्ड कप - दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया
- २०२८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
- २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी- भारत
- २०३० ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
- २०३१ वन डे वर्ल्ड कप - भारत आणि बांगलादेश