shoaib malik । नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात क्रिकेट सामना होणार म्हटलं की क्रिकेट विश्वात एकच उत्सुकता असते. कट्टर प्रतिस्पर्धींना एकमेकांविरूद्ध भिडताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये तोबा गर्दी होत असते. याशिवाय टीव्ही, मोबाईल जिथून शक्य होईल तिथून चाहते या लढतीचा आनंद घेत असतात. पण मागील जवळपास एक दशकापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झाली नाही. दोन्हीही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. दोन कट्टर प्रतिस्पर्धी दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. दोन्ही देशातील माजी खेळाडू सातत्याने यावर काही ना काही प्रतिक्रिया देत असतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक दशकापूर्वी शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा अर्थात २०१२-१३ मध्ये पाकिस्तानी संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. मागील काही महिन्यांपासून आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून दोन्ही क्रिकेट मंडळामध्ये वाद सुरू होता. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे, परंतु बीसीसीआय टीम इंडियाला देशात पाठवण्यास तयार नाही. प्रत्युत्तर म्हणून तत्कालीन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आशिया चषकासाठी मेन इन ब्लू पाकिस्तानमध्ये न आल्यास भारतातील ५० षटकांच्या विश्वचषकावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. पण शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे भारताचे आशिया चषकातील सामने तटस्थ ठिकाणी होणार असून पाकिस्तानी संघ भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी येणार आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा खेळाडू शोएब मलिकने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारत-पाकिस्तान सामना जगाला हवा आहे - मलिक "खेळ, फक्त क्रिकेटच नाही, यामध्ये सर्व खेळ येतात. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही एकमेकांच्या देशात जातो. शेजाऱ्यांचा एकमेकांवर सर्वाधिक अधिकार असतो. आम्ही भारताचे शेजारी आहोत आणि मला वाटते की दोन्ही देशांमधील खेळ पुन्हा सुरू व्हावा. मी अशी प्रार्थना देखील करतो. आताच्या घडीला जर तुम्ही ICC चा सर्वात मोठा सामना पाहिला तर तो फक्त भारत-पाकिस्तानचा आहे. अगदी पाकिस्तान-भारताच्या चाहत्यांनाच नाही तर इतर देशांतील चाहत्यांना देखील हा सामना भुरळ घालतो. खेळ देशांना जोडतो त्यामुळे भारत-पाकिस्तान हा सामना अवघ्या जगाला हवा आहे", असे शोएब मलिकने पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
तसेच जर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळले गेले तरी आपोआप काही गोष्टी सुरळीत होतील. दोन्ही देशातील राजकीय तणाव कमी होण्यास मदत होईल, असे शोएब मलिकने अधिक सांगितले. खरं तर शोएबने कसोटी आणि वन डे आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, ट्वेंटी-२० मधून त्याने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"