नवी दिल्ली-
क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. यावेळी वूमन्स क्रिकेटशी निगडीत घटना उघडकीस आली आहे. ढाका न्यूजचं आउटलेट जमुना टीव्हीनं एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. ज्यात बांगलादेशच्या दोन महिला क्रिकेटपटू बोलत आहेत. यातील एका खेळाडूचं नाव लता मंडल सांगितलं जात आहे जी बांगलादेश क्रिकेट टीमसोबत दक्षिण आफ्रिकेतच आहे. तर दुसरी क्रिकेटपटू शोहेली अख्तर असल्याचं बोललं जात आहे आणि ती सध्या बांगलादेशात आहे.
व्हायरल ऑडियो टेपनुसार शोहेली अख्तर हिनं एक सट्टेबाजाच्या माध्यमातून लता मंडल हिला फिक्सिंगची ऑफर दिली आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. ऑडियो क्लिपमध्ये शोहेली म्हणते की, "मी कोणतीही जबरदस्ती करत नाहीय, तुला हवं असेल तर खेळू शकतेस. तू खेळणार आहेस की नाही. आता तू ठरव की मॅच फिक्सिंग करायचं आहे की नाही? तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू फिक्सिंग करू शकतेस आणि फिक्सिंग करायचं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तू एक सामना चांगला खेळलीस की पुढच्या सामन्यात स्टम्पिंग किंवा हिट विकेट आऊट होऊ शकतेस"
बीसीबीकडे लतानं केली तक्रार"नाही..मी या गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकते. प्लीज मला या सगळ्या गोष्टी सांगू नकोस. मी हे असं कधीच करू शकणार नाही. माझी तुला विनंती आहे की या गोष्टी मला सांगू नको", असं लता मंडल हिनं शोहेली हिला उत्तर दिलं. लता हिनं याची तक्रार बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाकडे देखील केली आहे. बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरीनं ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितलं की, "आयसीसीचं अँटी करप्शन युनिट याप्रकरणात लक्ष देतं. बीसीबीच्या चौकशीचा हा विषय नाही. त्यामुळे बातम्यांच्या आधारावर आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे"