Join us  

दिनेश कार्तिकमुळे माझी कारकीर्द संपुष्टात आली, एस श्रीसंतचा खळबळजनक दावा

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 9:52 PM

Open in App

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. बीसीसीआयच्या लोकपालानं श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवून ती सात वर्षांची केली आणि ही बंदी पुढील वर्षी संपणार आहे. त्यानंतर श्रीसंत कदाचित क्रिकेटमध्ये पुन्हा परतलेला पाहायला मिळेल. पण, त्याच्या मनात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघाबद्दल असलेला तिरस्कार कायम राहणार आहे आणि हे श्रीसंतनेच सांगितले आहे. मात्र श्रीसंतनं एक खळबळजनक दावा केला आहे. त्यानं भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकवर गंभीर आरोप केले आहेत. 

2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतचा सहभाग समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील आजीवन बंदी उठविताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याचा सहभाग असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे स्पष्ट केले. न्या. ए मोहम्मद मुश्ताक यांनी बीसीसीआयकडून श्रीशांतविरुद्ध करण्यात आलेली सर्वच कारवाई रद्दबातल केली. निकालानंतर आनंदी झालेल्या श्रीशांतने क्रिकेटमधील ‘दुस-या इनिंग’ला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी केरळ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. श्रीशांत पुन्हा केरळ संघात दिसावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही केसीएने आधीच दिले आहेत. 

श्रीसंतने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,'' 2013मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याकडे दिनेश कार्तिकनं माझा तक्रार केली होती. श्रीनिवास यांच्या प्रती मी अपशब्द वापरल्याचे कार्तिकनं त्यांना सांगितले, त्यामुळे माझी कारकिर्द संपुष्टात आली.'' चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती, तेव्हाची ही घटना असल्याचे श्रीसंत सांगतो.  

कार्तिकने मात्र हे आरोप खोडून काढले. तो म्हणाला,'' श्रीसंतनं माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत भाष्य करणेही मला बावळटपणाचे वाटते'' 

'कॅप्टन कूल' धोनीच्या CSK संघाचा तिरस्कार; एस श्रीसंत असं का म्हणाला?मनात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघाबद्दल असलेला तिरस्कार कायम राहणार आहे आणि हे श्रीसंतनेच सांगितले आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असलेल्या श्रीसंतवर तत्कालीन मुख्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी टीका केली होती. श्रीसंतने हे सर्व आरोप खोडून काढले. मला चेन्नई सुपर किंगविरुद्ध खेळायचे होते, परंतु अप्टन यांनी मला संधी दिली नाही. अप्टन यांनी श्रीसंत हा उद्धट असल्याचे मत त्यांच्या आत्मचरित्रात मांडले होते. त्यावर श्रीसंत म्हणाला,''अप्टन यांनी हृदयावर व मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, की मी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोललो. दिग्गज राहुल द्रविड यांनाही मी विचारू इच्छितो की, त्यांच्याशी मी कधी वाद घातला ? मग अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात असे का म्हटले?''

तो पुढे म्हणाला,''मला चेन्नईविरुद्ध खेळू द्या, अशी विनंती मी वारंवार अप्टन यांना केली होती. मला त्यांना पराभूत करायचे होते. अप्टन यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला, मला फिक्सिंग करायची आहे, असा समज करून घेतला. मी चेन्नई सुपर किंगचा किती तिरस्कार करतो, हे सर्वांना माहित आहे. त्यामागे महेंद्रसिंग धोनी किंवा एन श्रीनिवास आहेत, असा अर्थ लोकांकडून लावला जाईल, परंतु हेही सत्य नाही. मला पिवळा रंग आवडत नाही. त्याच कारणामुळे मला ऑस्ट्रेलियाचा संघही आवडत नाही.''  

टॅग्स :श्रीसंतदिनेश कार्तिक