कोच्ची : सात वर्षांच्या बंदीनंतर भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत क्रिकेट मैदानावर परतला आहे. दहा जानेवारीपासून सुरू होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली देशांतर्गत क्रिकेट टी-२० स्पर्धेसाठी तो केरळकडून खेळणार आहे. त्याआधी, तयारी म्हणून सुरू झालेल्या सराव सामन्यात श्रीसंतची बेशिस्त वागणूक पहायला मिळाली. त्यावरून हा खेळाडू अद्यापही संयम शिकेलेला नाही, याची खात्री पटली आहे.
केरळ क्रिकेट संघटनेने यू ट्यूब चॅनलवर एका मिनिटाचा व्हिडिओ शअेर केला आहे. त्यात श्रीसंत फारच आक्रमक दिसत आहे. गोलंदाजी करताना तो फलंदाजांविषयी किती शेरेबाजी करतो हेदेखील या व्हिडिओमध्ये पहायला मिळाले. फलंदाज बाद झाल्यानंतर श्रीसंतने तर स्वत:चा तोल गमावला. असभ्य भाषेचा वापर करीत त्याने फलंदाजाला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. यामुळे पुनरागमनानंतरच्या पहिल्याच सामन्यात श्रीसंतवर टीका होत आहे.
सप्टेंबरमध्ये संपली बंदी
आयपीएल २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर बंदी घालण्यात आली होती. दीर्घकाळ न्यायालयीन लढाई जिंकल्यामुळे तो निर्दाेष ठरला. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची त्याला संधी मिळाली. केरळचा हा गोलंदाज आक्रमक वागणुकीसाठी भारतीय क्रिकेटमध्ये ओळखला जातो. याआधी अनेकदा त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत हमरीतुमरी केली आहे. त्च्याच्यावरील बंदी मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये संपली. त्याच महिन्यात त्याने स्थानिक टी-२० स्पर्धा खेळली होती. सध्या तो केरळकडून संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणार आहे.