IPL 2023: सनरायझर्स हैदराबादचा संघ IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. निराशाजनक हंगामानंतर मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) मुख्य प्रशिक्षकपद सोडले. IPL 2022 नंतर टॉम मूडी यांचा कार्यकाळ संपला आणि फ्रँचायझीने तो आगामी हंगामासाठी वाढवला (Extension) नाही. त्याऐवजी आता SRH फ्रँचायझीच्या मालकीणबाई काव्या मारन (Kavya Maran) यांनी जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या अनुभवी क्रिकेटपटूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara) याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. लारा यापूर्वी संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करत होता. ब्रायन लाराकडे खूप अनुभव आहे. त्याचा हा अनुभव सनरायझर्स हैदराबादसाठी उपयुक्त ठरू शकतो. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक छायाचित्र शेअर केले आणि लिहिले, 'क्रिकेट जगतातील दिग्गज ब्रायन लारा येत्या हंगामात आमचे मुख्य प्रशिक्षक असतील.'
माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांचे मानले आभार
सनरायझर्स हैदराबादने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले की, "आमच्यासोबत टॉम मूडी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या सेवेबद्दल आम्ही SRH कडून त्यांचे आभार मानतो. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यासोबतचा प्रवास खूप छान होता. आम्ही त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो."
IPL 2022 मध्ये खराब कामगिरी
केन विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ IPL 2022 मध्ये अप्रतिम खेळ दाखवू शकला नाही. संघाला १४ पैकी फक्त ६ सामने जिंकता आले आणि ८ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. याच कारणामुळे हा संघ 'प्लेऑफ'साठी पात्र ठरू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादसाठी काही मोजक्या खेळाडूंनाच कामगिरीत चमक दाखवता आली.