टीम इंडियातून निवृत्ती घेतल्यानंतर आपल्या चाहत्यांसाठी धोनी आयपीएलच्या मैदानात उतरत आहे. सीएसकेचा कर्णधार बनून धोनी आता चाहत्यांना आपल्या क्रिकेटची जादू दाखवतोय. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) पुन्हा एकदा धोनीची करामत पाहायला मिळाली. या सामन्यात धोनीने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यात, कर्णधार एडेन मार्कमचाही समावेश आहे. या सामन्यात धोनीच्या विकेट किपींगची चपळाई पाहून स्टेडियममध्ये एकच आवाज घुमू लागला. धोनी... धोनी.... अशा आवाजात चाहत्यांनी धोनीचं कौतुक केलं.
सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, १२ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर सनरायजर्सची धावसंख्या ९० असताना कर्णधार एडेन मार्कमचा झेल महेंद्रसिंह धोनीने टिपला. बॅटला कट लागून मागे आलेला चेंडू धोनीने अलगद आपल्या ग्लोव्हजमध्ये पकडला. त्यानंतर, १३ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर धोनीने क्लासेनची विकेट घेतली. जडेजाच्या गोलंदाजीवर क्लासेनला स्टंप आऊट करण्यात माही यशस्वी ठरला. धोनीने अफलातून चपळाई दाखवत क्लासेनला तंबूत पाठवलं. त्यावेळी, हैदराबादची धावसंख्या ९५ धावांवर ५ बाद अशी बनली होती.
तर, वॉशिंग्टन सुंदरला इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद करुन धोनीने उत्कृष्ट कामागिरी केली. कर्णधार आणि विकेट किपर म्हणून धोनीने हैदराबाविरुद्धच्या सामन्यात आपली किमया दाखवून दिली. त्यामुळेच, धोनीचा एखादा सामनाही पाहण्यासाठी मैदानावर चाहते गर्दी करत असतात.
१३५ धावांचे लक्ष्य
कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे, सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज फटकेबाजी करण्यासाठी मैदानात उतरले. मात्र, हैदराबादला २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावाच काढता आल्या. हैदराबादला १५० धावांचाही पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे, चेन्नईसाठी मोठं आव्हान ठेवण्यात हैदराबाद संघ अपयशी ठरला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्यानंतर, राहुल त्रिपाठी २१ आणि हॅरी ब्रुकने १८ धावा केल्या आहेत.
जडेजाने घेतले ३ बळी
चेन्नईकडून रविंद्र जडेजाची जादू चालली असून जडेजाने ४ षटकांत केवळ २२ धाव देत तब्बल ३ विकेट घेतल्या. जडेजाच्या गोलंदाजीमुळे हैदराबादचा संघ कमी धावात तंबूत परतला. आकाश सिंग, महेश किक्षणा आणि मतिशा पार्थिराना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे, हैदराबादला २० षटकांत १३४ धावांवर रोखण्यात आले. आता, चेन्नईला विजयासाठी २० षटकांत १३५ धावा करायच्या आहेत.