इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली. IPL 2020मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या वृद्धीमान सहानं ( Wriddhiman Saha) DCच्या गोलंदाजांना धुण्याची सुरुवात केली, मग दुसऱ्या बाजूला असलेल्या डेव्हिड वॉर्नरनेही ( David Warner) हात धूतले... त्यानंतर मनीष पांडेनंही फटकेबाजी करताना हैदराबादला २ बाद २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा दिल्लीला पाठलाग करता आला नाही. SRHनं या विजयासह प्ले ऑफचे आव्हान कायम ठेवले आहे. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव ठरला.
वॉर्नर आणि सहा यांच्य फटकेबाजीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ७७ धावा चोपल्या. IPL 2020मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. वॉर्नर आणि सहा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. वॉर्नर ३४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतरही सहाचा झंझावात कायम होता. सहानं ४५ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८७ धावा चोपल्या. मनीष पांडेनं फटकेबाजी करून हैदराबादला २ बाद २१९ धावांचा डोंगर उभा करून दिला. पांडे आणि केन विलियम्सन यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ४९ धावांची भागीदारी केली. पांडे ३१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर नाबाद राहिला, तर केन ११ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात हैदराबादच्या गोलंदाजांनीही दिल्लीला दणके दिले. शिखर धवन ( ०) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) यांना अनुक्रमे संदीप शर्मा व शाहबाज नदीन यांनी माघारी पाठवले. अजिंक्य रहाणे आज चांगल्या फॉर्मात दिसत होता, शिमरोन हेटमारयसह दिल्लीला सावरेल असेही वाटले होते. पण, राशिद खानच्या एका षटकात दोघेही माघारी परतले. राशिदनं दिल्लीला आणखी एक धक्का दिला. त्यानं ४ षटकांत ७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीचे ६ फलंदाज ८३ धावांवरच माघारी परतल्यानं त्यांचा पराभव निश्चित झाला होता. रिषभ पंतनं ( ३६) एकट्यानं खिंड लढवताना दिल्लीची इभ्रत वाचवण्याचा प्रयत्न केला. संदीप शर्मा ( २/२७)नेही उत्तम गोलंदाजी केली. दिल्लीचा संपूर्ण संघ १३१ धावांत तंबूत परतला. हैदराबादनं ८८ धावांनी हा सामना जिंकला.