Join us  

रोहित शर्माचं मुंबईसाठी 'द्विशतक'! SRH vs MI सामना हिटमॅनसाठी असणार खास, वाचा

Rohit Sharma News: आज हैदराबाद आणि मुंबई यांच्यात सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:08 PM

Open in App

SRH vs MI, IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील (IPL 2024) त्याचा मुंबई इंडियन्ससाठी २०० वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला असून आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी खास आहे. कारण रोहित मुंबईसाठी २०० वा सामना खेळत आहे. २०११ मध्ये तो मुंबईच्या फ्रँचायझीसोबत जोडला गेला. मागील १४ वर्षात हिटमॅनने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत १९९ सामना खेळले असून ५०८४ धावा केल्या आहेत. 

रोहितचे मुंबईसाठी 'द्विशतक'! २०१३ मध्ये रिकी पॉन्टिगनंतर रोहित शर्माने मुंबईचे कर्णधारपद सांभाळले. तेव्हापासून तो २०२३ पर्यंत मुंबईचा कर्णधार राहिला. रोहितने कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या हंगामातच पहिले जेतेपद पटकावले. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल जिंकली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या कालावधीतील १५८ पैकी ८७ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तर ६७ सामने गमवावे लागले. आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. हा सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. यंदा हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या संघाची धुरा सोपवण्यात आली असून रोहित एक केवळ खेळाडू म्हणून मैदानात आहे. 

मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव दरम्यान, रविवारी मुंबई इंडियन्सचा सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले. 

अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला. 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबाद