SRH vs MI, IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईचा सामना म्हटलं की क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे. त्याचं कारणही तितकेच आकर्षित करणारं आहे. खरं तर मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीनं हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यापासून मुंबईच्या संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. (IPL 2024) चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकला लक्ष्य करत आहेत. (Hardik Pandya Troll) मुबंईने आपला सलामीचा सामना रविवारी अहमदाबाद येथे खेळला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उपस्थित ८० हजार प्रेक्षकांनी हार्दिकबद्दल आक्षेपार्ह घोषणा दिल्या. रोहितला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून काढल्याने चाहत्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. याचाच दाखला देत भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने चाहत्यांना सुनावलं आहे. (IPL 2024 News)
हार्दिक पांड्याला ज्या प्रकारे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला त्यावरून वीरूनं जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. सेहवागनं म्हटलं की, मी खूप निराश आहे... कोणत्याही खेळाडूला ट्रोल केलं जाऊ नये या विचाराचा मी आहे. तो खेळाडू मग भारतीय असो की मग परदेशातील. चाहते सामना पाहण्यासाठी येतात त्यांनी सामना पाहावा आणि आपापल्या संघाला चीअर करावं. त्यांना काय करायचं आहे, हार्दिक गुजरातमधून मुंबईत आला की कुठे गेला.
तसेच कोणता खेळाडू कोणत्या संघात खेळतो आहे याला फार महत्त्व नाही. चाहते नाराज आहेत याची मला कल्पना आहे पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने राग व्यक्त करावा. कोणाचा अपमान करणं हे बरोबर नाही. या आधी देखील युवराज सिंगला अशा पद्धतीच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे, असंही सेहवागनं नमूद केलं.
दरम्यान, रविवारी मुंबई इंडियन्सचा सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले.
अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला.