Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे चारही संघ निश्चित झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातील शर्यात डेव्हिड वॉर्नरच्या टीमनं जिंकली. मुंबई इंडियन्सवर ( Mumbai Indians) सहज विजय मिळवून SRHनं सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमधील चौथे स्थान पक्के केले. आता एलिमिनेटर ( ६ नोव्हेंबर) सामन्यात SRHसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( Royal Challengers Bangalore) आव्हान असणार आहे, तर क्वालिफायर १ मध्ये ( ५ नोव्हेंबर) MIला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.
दुखापतीमुळे चार सामने बाकावर बसलेल्या रोहित शर्माचे आज संघात कमबॅक झाले. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, रोहितचं कमबॅक मुंबई इंडियन्सला फार फायद्याचे ठरले नाही. संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात रोहितला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं चौकारानं खातं उघडलं. संदीप शर्मानं टाकलेल्या पाचव्या षटकात क्विंटन डी'कॉकनं ४,६,६ अशा धावा कुटल्या, परंतु चौथ्या चेंडूवर क्विंटन दुर्दैवी त्रिफळाचीत झाला. क्विंटन २५ धावा करून माघारी परतला.
सूर्यकुमारनं त्याचा फॉर्म कायम राखताना IPL च्या सलग तिसऱ्या पर्वात ४००+ धावा करण्याचा पराक्रम केला. सूर्यकुमार आणि इशान किशन यांची तिसऱ्या विकेटसाठीची ४२ धावांची भागीदारी शाहबाज नदीमनं संपुष्टात आणली. वृद्धीमान साहानं चपळाईनं सूर्यकुमारला ( ३६) यष्टिचीत केलं. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर नदीमनं MIला आणखी एक धक्का देत कृणाल पांड्याला ( ०) बाद केले. राशिद खाननं पुढच्याच षटकात सौरभ तिवारीला ( ०) बाद करून मुंबईची अवस्था ५ बाद ८२ धावा अशी केली होती.
राशिदनं त्याच्याच गोलंदाजीवर इशान किशनचा सोपा झेल सोडला आणि तो SRHला महागात पडला. संदीपनं टाकलेल्या १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इशाननं खणखणीत षटकार खेचला, परंतु संदीपनं कमबॅक करताना पुढच्याच चेंडूवर त्रिफळा उडवला. इशान ३३ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्डनं १९व्या षटकात तीन सलग षटकार खेचून मुंबईला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मुंबई इंडियन्सनं २० षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या. पोलार्डनं २४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा चोपल्या.
प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धीमान साहा यांनी संघाला सॉलीड सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना SRHच्या विजयाचा पाया घातला. वॉर्नरनं ३६, तर साहानं ३४ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केली. या दोघांनी SRHला एकहाती सामना जिंकून दिला आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का केला. SRHनं १७.१ षटकांत एकही विकेट न गमावता १५१ धावा करून बाजी मारली. वॉर्नरनं ५८ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह नाबाद ८५ धावा, तर साहानं ४५ चेंडूंत नाबाद ५८ धावा केल्या.
Web Title: SRH vs MI Latest News : Sunrisers Hyderabad won crucial match and have entered playoffs, they face RCB in Eliminator on 6 November
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.