सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं होतं. त्याच निर्धारानं मैदानावर उतरलेल्या SRHनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला धक्का दिला. संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) व जेसन होल्डर यांच्यासह SRHच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना RCBला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. प्रत्युत्तरात SRHलाही सुरुवातीला धक्के बसले, परंतु मनीष पांडे व वृद्धीमान सहा यांनी त्यांची गाडी रुळावर आणली. या सामन्यात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला गेला.
संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात देवदत्त पडीक्कलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाचव्या षटकात विराट कोहलीला त्यानं केन विलियम्सनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. RCBचे दोन फलंदाज २८ धावांवर माघारी परतले होते. देवदत्त व विराट माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या एबीनं चौथी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला पार केला. ही कामगिरी करणारा तो ८वा फलंदाज ठरला. एबी डिव्हिलियर्स २४ धावा करून शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यापाठोपाठ राशिद खाननं RCBच्या जोश फिलिफला ( ३२) बाद केले. त्यानंतर RCBला सावरता आले नाही. त्यांना ७ बाद १२० धावांवर समाधान मानावे लागले.
प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर ( ८) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. २०१६नंतर वॉर्नर प्रथमच पहिल्या पॉवर प्लेमध्ये फिरकीपटूच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉशिंग्टन सूंदरनं त्याला बाद केले. त्यानंतर वृद्घीमान सहा व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHची गाडी रुळावर आणली. मनीष २६ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सहानं केन विलियम्सनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु चहलनं त्यालाही ३९ धावांवर बाद केले. तत्पूर्वी, १०व्या षटकात इसूरु उडानाच्या गोलंदाजीवर पंचांनी एक चूक केली. उडानानं टाकलेला फुलटॉस नो बॉल होता, तहीरी पंचांनी तो दिला नाही. केननं त्यावर नाराजी प्रकट केली.
अम्पायरच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोफ्रा आर्चर, जिमी निशॅमसह हरभजन सिंग यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.