Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अशक्यप्राय विजय मिळवला. १५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचे ( RR) पाच फलंदाज ७८ धावांवर माघारी परतले होते. खलील अहमद ( Khaleel Ahmed) आणि रशीद खाननं ( Rashid Khan) महत्त्वाच्या विकेट्स घेत RRला कोंडीत पकडले होती, परंतु टेवाटिया व परागनं ही कोंडी तोडली अन् RRला विजय मिळवून दिला. शाहजाहनंतर टेवाटियानं पुन्हा एकदा स्फोटक खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. टेवाटियाच्या या फटकेबाजीवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंही भन्नाट ट्विट केलं.
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो फटकेबाजी करत होता. पाचव्या षटकात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर बेअरस्टोनं पुल शॉट मारला आणि डिप स्क्वेअरला उभ्या असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) सुरेखरित्या तो टिपून RRला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. १५ व्या षटकात जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ७३ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. आर्चरनं ४८ धावांवर वॉर्नरला त्रिफळाचीत केलं. मनीषनं ५४ धावा केल्या. अखेरच्या षटकांत हैदराबादनं कमबॅक करताना ४ बाद १५८ समाधानकारक पल्ला गाठला.
प्रत्युत्तरात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं सलामीला जोस बटलरसह IPL 2020 पहिलाच सामना खेळणाऱ्या बेन स्टोक्सला पाठवलं. स्टोक्सनं पहिल्या षटकात चौकार खेचून आक्रमक पवित्रा असल्याचे दाखवले. पण, पुढच्याच षटकात SRHचा कर्णधार वॉर्नरनं खलील अहमदला गोलंदाजीला आणले आणि त्यानं स्टोक्सला बाद केले. IPL मध्ये स्टोक्स दुसऱ्यांदा सलामीला आला. यापूर्वी २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्यानं ११ ( ७ चेंडू) धावा केल्या होत्या आणि आज ५ (६ चेंडू) धावा केल्या. त्यानंतर स्मिथ ( ५, धावबाद) आणि बटलर ( १६) माघारी परतल्यानं राजस्थान अडचणीत सापडले. रॉबिन उथप्पा चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु रशीद खाननं त्याला ( १८) पायचीत केलं. संजू सॅमसनलाही त्यानंच बाद केलं आणि RRचा निम्मा संघ ७८ धावांत माघारी परतला होता.
राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RRला शर्यतीत कायम राखले होते. अखेरच्या १८ चेंडूंत विजयासाठी ३६ धावांची गरज असताना टेवाटियानं रशीद खानच्या एका षटकात १४ धावा चोपल्या. नटराजननं टाकलेल्या १९व्या षटकातही १४ धावा चोपून ६ चेंडूंत ८ धावा असा सामना फिरवला. राहुलनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ४५ धावा केल्या, तर परागनं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह नाबाद ४२ धावा करून RRला पाच विकेट्सनं विजय मिळवून दिला. वीरूनं ट्विट केलं की, टेवाटिया एक क्रांती है, बॉलरो की शांती है. टेवाटिया एक बाण है, राजस्थान के लिये टेवाटिया प्राण है. भगवान टेवाटियासमोर नतमस्तक. रियान पराग अन् टेवाटियाची अविश्वसनीय खेळी.