नवी दिल्ली : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेच्या आधी आशियाई किंग्ज श्रीलंकेच्या शिलेदाराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने कसोटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
हसरंगाची कसोटी कारकिर्द २४ वर्षीय वानिंदू हसरंगाने २०२० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेसाठी फक्त ४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला चार बळी घेण्यात यश आले. फलंदाजीबद्दल भाष्य करायचे झाले तर, हसरंगाने ४ कसोटी सामन्यांमध्ये १९६ धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी वानिदू हसरंगा मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणार आहे. २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हसरंगाने मंगळवारी कसोटी क्रिकेटला रामराम केले. त्याने शेवटच्या वेळी एप्रिल २०२१ मध्ये मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी सामना खेळला होता. हसरंगा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दिली आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे.