पोर्ट एलिजाबेथ, दक्षिण आफ्रिक विरुद्ध श्रीलंका : श्रीलंका क्रिकेट संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या श्रीलंकेने 8 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे. आफ्रिकेच्या 197 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दोन विकेट्स गमावले. कुशल मेंडिस ( 84*) आणि ओशादा फर्नांडो ( 75*) यांनी नाबाद खेळी करताना श्रीलंकेचा विजय निश्चित केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सपाटून मार खाणाऱ्या श्रीलंकन संघाकडून आफ्रिका दौऱ्यात फार अपेक्षा केल्या जात नव्हत्या. मात्र, पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने यजमानांना पराभवाचा धक्का देत सर्वांना आश्चर्यचकित केले. कुशल परेराच्या नाबाद 153 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटीत 1 विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला होता. आफ्रिकेचे 304 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने परेराच्या एकहाती खेळीच्या जोरावर पार केले होते. धनंजया डी सिल्वाने ( 48) त्याला काही काळ साथ दिली. पण, परेराने अखेरपर्यंत खिंड लढवली होती.
दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 222 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 154 धावांत गडगडला. पण, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आफ्रिकेला कोंडीत पकडले. सुरंगा लकमल ( 4/39), धनंजया डी सिल्वा ( 3/36), कसून रंजिता ( 2/20) यांनी आफ्रिकेचा दुसरा डाव 128 धावांवर गुंडाळला. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेचे दोन फलंदाज 34 धावांवर माघारी परतले होते. पण, फर्नांडो व मेंडिस यांनी खिंड लढवताना संघाला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करणारा श्रीलंका हा तिसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेत याआधी इंग्लंडने 1889 ते 2016 या कालावधीत 11, तर ऑस्ट्रेलियाने 1902 ते 2014 या कालावधीत 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेत 6 कसोटी मालिका खेळल्या आणि त्यात प्रथमच त्यांना विजय मिळवता आला आहे. भारताने येथे 7 कसोटी मालिका खेळल्या आणि त्यातील 1 मालिका त्यांना बरोबरीत रोखता आली, उर्वरित 6 मालिकेत त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानलाही 6 पैकी पाच मालिकेत पराभव पत्करावा लागला, तर एक मालिका बरोबरीत सुटली. बांगलादेशला येथे तीनही कसोटी मालिका गमवाव्या लागल्या.
Web Title: Sri Lanka become the first ever Asian team to win a Test series in South Africa.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.