नवी दिल्ली : श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू दासुन शनाकाने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. एक दिवस आयपीएलमध्ये खेळण्याची संधी नक्कीच मिळेल, असा विश्वास असल्याचे त्याने म्हटले आहे. मागील काही कालावधीपासून श्रीलंकेचा कर्णधार शनाका शानदार खेळी करत आहे. त्यामुळे सर्वांना अपेक्षा होती की, त्याला आयपीएलच्या लिलावात खरेदी केले जाईल. मात्र, त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही आणि तो अनसोल्ड राहिला.
दरम्यान, दासुन शनाकाने भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत जबरदस्त शतक झळकावले होते आणि 88 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने पुण्यात भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात केवळ 22 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याचवेळी पहिल्या ट्वेंटी-20 मध्ये त्याने 27 चेंडूत 45 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी पाहून गौतम गंभीर म्हणाला होता की, जर आता आयपीएलचा लिलाव झाला असता तर शनाकाला खूप महागडी बोली लागली असती.
"भविष्यात मला IPL मध्ये खेळण्याची संधी मिळेल"आता दासुन शनाकाने आयपीएलमध्ये सहभागी होण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना त्याने म्हटले, "भारताचा विचार केला तर इथल्या खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल आहेत. त्यामुळे मला येथील परिस्थितीमध्ये फलंदाजीचा आनंद मिळतो. तसेच आक्रमकता माझ्या खेळात आहे. आयपीएलमध्ये माझी निवड झाली नाही, याने मला काही फरक पडत नाही. मला खात्री आहे की भविष्यात मला भारतात खेळण्याची संधी नक्कीच मिळेल. त्यामुळेच मी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"