कोलंबो : आशिया चषक २०२३ श्रीलंकेत खेळवला जात आहे. सततच्या पावसामुळे चाहत्यांना या स्पर्धेचे आयोजन खटकले, पण श्रीलंकेच्या मैदानी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पाऊस थांबताच मैदान सज्ज ठेवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. त्यांच्या या मेहनतीमुळेच चाहत्यांना सामन्यांचा आनंद घेता आला. कर्मचाऱ्यांची मेहनत पाहता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेकांनी ग्राउंड स्टाफ यांच्या कामाला दाद दिली.
आशिया चषकात खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये पावसामुळे बराच व्यत्यय आला होता. असे असताना देखील पाऊस थांबताच मैदान खेळण्यासाठी सज्ज व्हावे यासाठी श्रीलंकेच्या ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्स यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद आणि श्रीलंका क्रिकेटने त्यांना बक्षीसाची घोषणा केली आहे. यामध्ये कॅंडी आणि कोलंबोच्या मैदानी कर्मचाऱ्यांना ५० हजार यूएस डॉलर एवढी रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ४२ लाख रूपये दिले जाणार आहेत. याबाबत जय शहा यांनी एक पोस्ट करून माहिती दिली आहे.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ मधील सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवला गेला. या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. अशा परिस्थितीत मैदानावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या मेहनतीने त्या दिवशीही मैदान खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज ठेवले होते.
रोहितकडून 'विराट' कौतुककर्मचाऱ्यांच्या मेहनतीला सलाम ठोकताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्यांचे तोंडभरून कौतुक केले. विराट कोहलीने देखील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.