Join us  

८.३५ मिनिटांत २ किमी अंतर पार न केल्यास पगार कपात; श्रीलंकन बोर्डानं खेळाडूंच्या फिटनेससाठी बनवले विचित्र नियम!

श्रीलंका  क्रिकेट बोर्डानं ( SLC) खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी कठोर नियमावली तयार केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:51 PM

Open in App

श्रीलंका  क्रिकेट बोर्डानं ( SLC) खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी कठोर नियमावली तयार केली आहे. एकतर पूर्णपणे तंदुरूस्त व्हा किंवा संघाबाहेर होण्यास तयार राहा, असे स्पष्ट संकेत निवड समितीनं खेळाडूंना दिले आहेत. श्रीलंका बोर्डानं करारबद्ध खेळाडूंना याबाबत माहिती दिली असून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या अन्यथा पगार कपातीचा सामना करा, असे संकेत दिले. तेथील स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार SLCनं खेळाडूंसाठी नियमावली तयार केली आणि जानेवारी २०२२पासून त्याचे पालन करावे लागणार आहे. यात खेळाडूंना २ किलोमीटरचे अंतर ८.१० मिनिटांत पार करणे सक्तिचे केले आहे, तसेच शरिरही शेपमध्ये आणण्याच्या सूचना करण्यात  आल्या आहेत.

२ किमी अंतर पार करण्यास ८.५५ मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागल्यास संघात निवड होणार नाही

  • ८.३५ ते ८.५५ मिनिटं लागल्यास पगारात कपात होईल. जे खेळाडू २ किमी अंतर ८.३५ मिनिटांच्या आता पार करतील ते संघ निवडीसाठी पात्र ठरतील, परंतु या खेळाडूच्या पगारातून कपात केली जाईल
  • संघात निवड पक्की करण्यासाठी खेळाडूंना २ किमी अंतर ८.१० मिनिटांत पार करावे लागणार आहे.  
  • ७ जानेवारीला पहिली फिटनेस टेस् होईल, अशा चार चाचण्या होतील. 

 

''फेब्रुवारीपर्यंत ८.३५ मिनिटांत जे खेळाडू २ किमी अंतर पार करतील, ते पुढील टप्प्यासाठी म्हणजेच ८.१० मिनिटांच्या परीक्षेसाठी पात्र ठरतील. खेळाडूंनी त्यांच्या तंदुरुस्तीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, हा आमचा मानस आहे. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,''असे श्रीलंका निवड समितीचे प्रमुक प्रमोद्या विक्रमासिंघे यांनी सांगितले.  

श्रीलंकन संघ फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत दौऱ्यावर दोन कसोटी व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ते येणार आहेत. SLCनं नुकतीच माहेला जयवर्धने याची श्रीलंकेच्या सीनियर संघाच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती केली.   

टॅग्स :श्रीलंकाफिटनेस टिप्स
Open in App