Join us  

Kusal Mendis hospitalized, BAN vs SL: सामना सुरू असतानाच श्रीलंकेच्या खेळाडूला करावं लागलं रूग्णालयात दाखल

फिल्डर करत असतानाच तो जमिनीवर बसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 2:15 PM

Open in App

Kusal Mendis hospitalized, BAN vs SL: बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना २३व्या षटकात श्रीलंकेचा स्टार खेळाडू कुसल मेंडिस याला तातडीने सामना थांबवून  रूग्णालयात दाखल करण्यात आले. कुसल मेंडिसच्या अचानक छातीत दुखू लागल्याची तक्रार त्याने केली. त्यानंतर वैद्यकीय टीमच्या मदतीने त्याला झटपट रूग्णालायात हलवण्यात आले. ताज्या माहितीनुसार, श्रीलंकेचा विकेटकिपर-फलंदाज कुसल मेंडिस याला ढाकाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिल्डिंग करत असताना त्याने अचानक स्वत:ची छाती पकडली आणि तो मैदानातच खाली बसला. त्यानंतर लगेचच त्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले आणि रूग्णालयात हलवण्यात आले.

कुसल मेंडिस याला झालेला त्रास हा फारसा गंभीर नसावा अशी श्रीलंकन कॅम्पमधून आशा व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कुसल मेंडिस अप्रतिम फलंदाजी करताना दिसला होता. त्याने दमदार अर्धशतक ठोकलं होतं, तसेच अँजेलो मॅथ्यूजच्या साथीने ९८ धावांची महत्त्वाची भागीदारीही केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही कुसल मेंडिसने ४३ चेंडूत ४८ धावांची धुवाँधार खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावरच लंकेने पहिली कसोटी अनिर्णित राखली होती.

दुसऱ्या कसोटीची सुरूवात श्रीलंकेच्या नावावर, पण...

आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात बांगलादेशी फलंदाजांची तारांबळ उडाली. पहिल्या सात षटकांमध्येच बांगलादेशची अवस्था ५ बाद २४ अशी झाली होती. शाकीब अल हसन, मोमीनुल हक, तमिम इकबाल यांसारख्या अनुभवी खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. पण त्यानंतर मुश्फीकूर रहिम आणि लिटन दास दोघांनी अर्धशतके ठोकली आणि अप्रतिम भागीदारी करत दुपारच्या सत्रापर्यंत संघाला विकेट न गमावता १५०पार मजल मारून दिली.

टॅग्स :श्रीलंकाबांगलादेशहॉस्पिटल
Open in App