इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या मिलन रथनायके (Milan Rathnayake ) विश्व विक्रमी खेळी साकारली. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करत त्याने भारताच्या दिग्गजाचा ४१ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला. याआधी हा विक्रम टीम इंडियातील १९८३ चा वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बलविंदर संधू या दिग्गजाच्या नावे होता.
भारताच्या वर्ल्ड चॅम्पियननं पाकिस्तान विरुद्ध केला होता हा पराक्रम
भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन स्टार खेळाडूनं पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात तळाच्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली होती. बलविंदर संधू या दिग्गजाने १९८३ मध्ये हैदराबादच्या मैदानात पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७१ धावांची दमदार इनिंग खेळली होती. दुसऱ्या डावात त्याने १२ धावा आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. १९८३ पासून नवव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूच्या नावे होता. आता हा विक्रम मागे पडला आहे.
श्रीलंकेच्या खेळाडूचा पदार्पणातच डंका
श्रीलंकेच्या खेळाडूनं इंग्लंडच्या मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे पदार्पणाच्या सामन्यात त्याने ही किमया साधली आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांन नांगी टाकल्यावर तळागाळात बॅटिंगला आलेल्या मिलन रथनायके याने सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने १३५ चेंडूचा सामना करत ७२ धावा केल्या. त्याच्या या विक्रमी खेळीत ६ चौकारांसह २ षटकारांचा समावेश होता.
बॉलरची बॅटिंगमधील पॉवर दिसली, आता मुख्य भूमिका बजावण्याचा मार्ग होईल सोपा
२८ वर्षीय मिलन रथनायके हा श्रीलंकेच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज आहे. तो उजव्या हाताने मध्यम गतीनं गोलंदाजी करतो. पहिला कसोटी सामना खेळताना गोलंदाजी आधी त्याने आपल्या फलंदाजीतील चमक दाखवून देत इंग्लंडच्या मैदानात भारतीय वर्ल्ड चॅम्पियन फिरकीपटूनं बॅटिंगमध्ये प्रस्थापित केलेला विक्रम मागे टाकला. ही कामगिरी त्याला गोलंदाजीतही आत्मविश्वास देणारी ठरेल, अशीच आहे.
Web Title: Sri Lanka Debutant Milan Rathnayake Breaks 41 Year Old Test Record Of India's 1983 World Cup champion Star Balwinder Sandhu
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.