बंगळुरू : श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकानंतर भारताने दुसऱ्या दिवसरात्र कसोटीत रविवारी श्रीलंकेला ४४७ धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर २८ धावांवर एक बळी घेत यजमान संघाने आपले वर्चस्व कायम राखले. अय्यर याने ८७ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी करत सामन्यात सलग दुसरे अर्धशतक केले तर ऋषभ पंत याने ३१ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने २८ चेंडूतच ५० धावा केल्या. तो भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू ठरला. भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ वर घोषित केला.
कर्णधार रोहित शर्मा (४६ धावा) हनुमा विहारी (३५) यांनीही उपयुक्त खेळी केली. श्रीलंकेकडून डाव्या हाताचा फिरकीपटू प्रवीण जयविक्रम याने ७८ धावात चार तर लसिथ एम्बुलदेनिया याने ८७ धावात तीन बळी घेतले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार दिमुथ करुणारत्ने १० तर कुसाल मेंडिंस १६ धावांवर खेळत होते. श्रीलंकेच्या लहिरु तिरिमाने याला भोपळाही फोडता आला नाही. श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी अजूनही ४१९ धावांची गरज आहे. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने देखील कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा आणि मायदेशात पहिल्यांदाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले.
बुमराहचा विक्रमी मारा
२०१७ सालानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ५० हून कमी ४९.९५ अशी झाली आहे. याआधी २०१७ मध्ये त्याची सरासरी ४९.५५ अशी झाली होती.जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण केले.बुमराहने कसोटीत आठव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली.- बुमराहचा मारा कसोटीत श्रीलंकेविरुद्धचा सर्वोत्तम भारतीय वेगवान मारा ठरला.बुमराहने मायदेशात पहिल्यांदाच एका डावात ५ बळी घेतले.
सर्वात वेगवान यष्टिरक्षक
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा यष्टिरक्षक ठरला. त्याने महेंद्रसिंग धोनीचा ३४ चेंडूंतील अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडला. धोनीने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध ३४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. तिसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंडच्या इयान स्मिथनेही १९९० साली पाकिस्तानविरुद्ध ३४ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते.
कपिल देव यांना टाकले मागे
ऋषभ पंत याने या वादळी खेळीत भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले आहे. पंतने कपिल यांचा ४० वर्षे जुना विक्रम मोडला. कपिल यांनी ३० चेंडूतच पाकिस्तानविरोधात अर्धशतक केले होते. तर शार्दुल याने २०२१ मध्ये इंग्लंडविरोधात ३१ चेंडूतच अर्धशतक केले होते. या दोघांनाही पंतने आजच्या खेळीत मागे टाकले.