नवी दिल्ली : सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (NZ vs SL) असलेल्या श्रीलंकेची डोकेदुखी आणखी वाढली आहे. या दौऱ्यातील पहिली कसोटी गमावल्याने जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम (WTC 2023) फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला होता. अशातच आता वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर थेट विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेचा मोठा पराभव झाला होता. खरं तर श्रीलंकेचा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला असून आयसीसीने श्रीलंकेच्या खात्यातील एक गुण वजा केला आहे.
खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या 20 टक्के दंड आकारला जातो. हे कलम किमान ओव्हर रेटशी संबंधित आहे. तसेच निर्धारित वेळेत कमी षटके टाकल्यास हा दंड आकारला जातो. याशिवाय ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग खेळण्याच्या अटींच्या कलम 16.12.2 नुसार, संघाला प्रत्येक षटकासाठी एक गुण दंड आकारला जातो.
दासुन शनाकाने दिली कबुली दरम्यान, सामनाधिकारी जेफ क्रो यांना दासुन शनाकाचा श्रीलंकेचा संघ नियोजित वेळेपेक्षा एक षटक मागे असल्याचे आढळले. या कारणामुळे श्रीलंकेच्या संघाला 20 टक्के दंड आणि एक गुण कपातीचा फटका सहन करावा लागला. मैदानावरील अम्पायर शॉन हेग आणि वेन नाइट्स, थर्ड अम्पायर ख्रिस ब्राउन आणि फोर्थ अम्पायर कोरी ब्लॅक यांनी हे आरोप केले आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने आपली चूक मान्य केली असून यापुढे समज देण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले आहे.
श्रीलंकेसाठी 'करा किवा मरा'ची स्थिती पहिल्या वन डेत न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 274 धावा केल्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 76 धावांत गारद झाला. किवी संघाकडून वेगवान गोलंदाज हेन्री शिपलीने घातक गोलंदाजी करताना पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर मालिकेतील दुसरा वन डे सामना आज 28 मार्च रोजी होणार होता पण पावसामुळे सामना रद्द करावा लागला. अशा स्थितीत विश्वचषकात थेट पात्र होण्यासाठी श्रीलंकेला शेवटचा वन डे सामना जिंकावाच लागणार आहे, त्याचबरोबर इतर काही संघांवर देखील अवलंबून राहावे लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"