Join us  

"वन डे वर्ल्ड कप भारतच जिंकेल पण कधी कधी...", दिग्गज मुथय्या मुरलीधरनची 'मन की बात'

भारतीय संघ काही दिवसांनंतर एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 5:16 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ काही दिवसांनंतर एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे. ५ ऑक्टोबरपासून बहुचर्चित वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून, या स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून यजमान भारताला पाहिले जात आहे. श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरनने देखील भारतीय संघ आगामी विश्वचषक उंचावेल असा विश्वास व्यक्त केला. 'GOAT' of spin, या पोडकास्टमध्ये बोलताना त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

आगामी विश्वचषकाची सुरूवात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने होईल. २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरून आपल्या अभियानाचा श्रीगणेशा करतील. तर याच मैदानावर १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. मुरलीधरनच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांमध्ये देखील ट्रॉफीवर कब्जा करण्याची क्षमता आहे. 

"विश्वचषकात घरच्या क्राउडमुळे भारताला मोठी साथ मिळेल. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय चाहते मैदानात असतील. आपण कुठेही गेलो तरी टीम इंडियाचे चाहते पाहायला मिळतात. त्यामुळे मला वाटते की, ही टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ तगडे असले तरी भारताचा वरचष्मा असल्याचे मला दिसते. तसेच विश्वचषक उंचावण्यासाठी कधी कधी नशिबाची देखील साथ हवी असते. कारण २०१९ च्या अंतिम सामन्यात ते पाहायला मिळाले अन् न्यूझीलंडच्या तोंडचा घास गेला", असेही त्याने नमूद केले. 

विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया