अयाझ मेमन
अ खेर बीसीसीआयनेआयपीएल पुढील सूचनेपर्यंत स्थगित केल्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे जर परिस्थिती सुधारली, तर कदाचित या वर्षी आयपीएलचा धमाका पाहण्यास मिळू शकतो. एकूणच बीसीसीआयने स्पर्धा आयोजनाचा एक मार्ग अजूनही खुला ठेवलेला आहे. जर स्पर्धाच रद्द केली, तर याचा अर्थ एक संपूर्ण सत्र गमवावे लागेल. त्यामुळेच जितकी शक्य होईल, तितकी प्रतीक्षा करण्याचा प्रयत्न बीसीसीआयकडून होताना दिसत आहे. पण सध्या कोरोना विषाणूचे संकट जगभरात पसरले असून कुठेही दिलासादायक परिस्थिती दिसून येत नाही. पण या सर्व गोंधळामध्ये एक चांगली बाबही समोर आली, ती म्हणजे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलचे यजमानपद भूषविण्यास आपली तयारी दाखविली आहे. त्यामुळे आता आयपीएल आयोजनाची गोष्ट एका रोमांचक वळणावर आली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी बीसीसीआयकडे हा प्रस्ताव ठेवला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने असा दावा केला आहे की, श्रीलंका भारताच्या आधी कोरोना विषाणूवर मात करेल. त्यांच्यानुसार पुढील २-३ महिन्यांमध्ये ते कोरोनावर मात करतील. त्यामुळे यानंतर त्यांना आपल्या देशात आयपीएल होण्याची शक्यता दिसून येत आहे. तरी असा प्रस्ताव ठेवण्यामागे श्रीलंकेचा काय हेतू आहे किंवा यामागे काही राजकीय हेतू आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. यावर माझ्या मते दोन-तीन मुद्दे असतील. पहिले म्हणजे आर्थिक. शमी सिल्वा यांनीही यावर थेट सांगितले की, आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला साडेतीन-चार हजार कोटींचा फटका बसेल. जर त्यांनी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली, तर हा फटका काही प्रमाणात कमी बसेल. शिवाय यातून श्रीलंकेचाही फायदा होईल. त्यामुळेच हे एकप्रकारे एकाच दगडात दोन पक्षी मारल्यासारखे आहे. याशिवाय पहिल्यांदाच आयपीएल भारताबाहेर खेळविली जाणार असेही नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. क्रिकेटसाठी श्रीलंका शानदार देश आहे यात वाद नाही. एकट्या कोलंबो शहरातच तीन स्टेडियम आहेत, जेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन होत असते. याशिवाय गॉल, कँडी असे नावाजलेले स्टेडियम्स लंकेकडे आहेत. याशिवाय पोलीस, आरोग्य अशा विविध सपोर्ट सिस्टिम्स उभ्या करण्याची क्षमताही श्रीलंकेकडे आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की, कोरोना विषाणूच्या नायनाटानंतर लगेच ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयपीएल रद्द करण्यात आल्याची घोषणा अद्याप झालेली नसल्याने अजूनही आयपीएल आयोजनाची अंधूक आशा कायम आहे; आणि हीच सर्वांत मोठी दिलासादायक बातमी आहे.२००९ साली आयपीएल दक्षिण आफ्रिकेत झाली होती, तर २०१४ साली स्पर्धेचे पहिले सत्र यूएईमध्ये खेळविण्यात आले होते. त्यामुळेच श्रीलंकेला यजमानपदासाठी आशा आहे. आयपीएल आयोजनासाठी श्रीलंकेकडे पुरेशा सोयीसुविधा आहेत का, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.
( लेखक लोकमत वृत्तसमुहात सल्लागार संपादक आहेत )