अयाज मेमन
भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेआधी कोरोनाशी लढा देत आहे. त्याचवेळी दुसरा भारतीय संघ श्रीलंकेत रविवारपासून मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज झाला. लंकेविरुद्ध मालिका टी-२० विश्वचषकाआधी महत्त्वपूर्ण मानली जाते. युवा खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे असून कोच राहुल द्रविड आहेत.
मुख्य कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ विश्वचषकासह संपणार आहे. शिवाय ते ६० वर्षांचे होतील. सोशल मीडियावर ते सारखे ट्रोल होतात, पण मागील चार वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनात झालेली संघाची कामगिरी नजरेआड करता येणार नाही. अशावेळी प्रश्न निर्माण होतो की शास्त्री यांना पुन्हा जबाबदारी सोपविली जाईल की त्यांची जागा द्रविड घेतील? द्रविड या पदाला दीर्घकाळ न्याय देतील की मग एनसीएचे मुख्य कोच म्हणून भूमिका कायम राखतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळणार आहेत. या सर्व गोष्टींच्या आधी श्रीलंका दौऱ्यात खेळाडू कशी कामगिरी करतील, याकडे लक्ष असेल. ही मालिका युवा खेळाडूंचा पुढील प्रवास निश्चित करणार आहे.
श्रीलंकेत असलेल्या संघात आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आहेत. पण ते केवळ टी-२० पर्यंत मर्यादित नाहीत, वन डेतही सरस ठरू शकतात. त्यातील काही तर कसोटीत क्रिकेटमध्ये प्रभाव पाडू शकतात. दुसरीकडे काही दिग्गज खेळाडूृ ऐनवेळी अपयशी ठरतात हे देखील तितकेच खरे.शिखर धवन, भुवनेश्वर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन हे काही काळापासून राष्ट्रीय संघातून आतबाहेर होत राहिले. सॅमसन आणि चहल यांना मर्यादित षटकांच्या सामन्यातील स्पेशालिस्ट मानले तरी अन्य खेळाडूंना कसोटीतही स्वत:चे स्थान टिकविता आले नाही.
कुलदीप आणि चहल यांच्यादृष्टीने मागील २० महिन्यांचा काळ खराब असाच म्हणावा लागेल. वन डे आणि टी-२०त संघात असताना वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजामुळे केवळ बाकावर बसण्याचेच काम या दोघांकडे होते. आगामी दोन आठवड्यात हार्दिकच्या कामगिरीवरही लक्ष असेल. अष्टपैलू पांड्या फिनिशरही आहे. शिवाय चांगला क्षेत्ररक्षक म्हणून संघ तुल्यबळ करतो. पण २०१९ पासून गोलंदाजी करीत नसल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. तो सामना जिंकून देणारा खेळाडू असेलही पण गोलंदाजी करीत नसेल तर काय फायदा? लंका दौऱ्यात फिटनेस सुधारुन गोलंदाजी करणार असेल तर विश्वचषकासाठी पांड्याच्या नावाचा निवडकर्ते नक्की विचार करू शकतील.
कोच आणि कर्णधार सध्या इंग्लंडमध्ये आहेत. अशावेळी टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडण्याच्या दृष्टीने निवडकर्ते कोहली, धवन, रोहित, अय्यर, बुमराह, शमी, सुंदर, हार्दिक, टी. नटराजन, सैनी, ठाकूर, अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, कृणाल पांड्या आदींच्या नावाला प्राधान्य देतील, अशी शक्यता दिसते. अशावेळी या खेळाडूंना यशस्वी व्हावेच लागेल. युवा खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया, सूर्यकुमार यादव हेदेखील राष्ट्रीय संघाच्या प्रतीक्षेत आहेत. श्रीलंका दौऱ्यात प्रस्थापित खेळाडूंवर युवा खेळाडूंच्या कामगिरीची भीतीदेखील राहणार आहे.