गुवाहाटी : अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघ भारताविरुद्ध तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत गुरुवारी येथे दाखल झाला. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरुद्ध (सीएए) सुरू असलेल्या
प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका संघाला कडक सुरक्षा व्यवस्थेत हॉटेलमध्ये आणण्यात आले.
भारतीय संघ रविवारी होणाऱ्या लढतीसाठी शुक्रवारी येथे पोहोचण्याची शक्यता आहे. आसाम क्रिकेट संघटनेच्या (एसीए) एका पदाधिकाºयाने सांगितले की,‘दोन्ही संघांसाठी पर्यायी सराव सत्र आहे. सुरुवातीला श्रीलंका संघ सराव करणार आहे आणि सायंकाळी भारतीय संघ.’ आसाममध्ये सीएएविरुद्ध डिसेंबर महिन्यात मोठ्या पातळीवर विरोध प्रदर्शन झाले होते. त्यामुळे रणजी व १९ वर्षांखालील सामने प्रभावित झाले होते.
एसीएचे सचिव देवजित सैकिया म्हणाले,‘आता येथील परिस्थिती सामन्य असून राज्यातील पर्यटन पूर्णपणे सुरू आहे. आम्ही १० जानेवारीपासून ‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेचे यजमानपद भूषवित असून त्यात जवळजवळ सात हजार खेळाडू सहभागी होत आहेत. हा प्रदेश देशातील अन्य प्रदेशांप्रमाणे सुरक्षित आहे. राज्य सरकार सुरक्षा व्यवस्था बघत असून कुठलीच अडचण नाही.’
बारासपारा स्टेडियमची क्षमता ३९,५०० प्रेक्षकांची आहे. त्यात २७००० तिकीटे पहिलेच विकली आहेत. सैकिया पुढे म्हणाले,‘नागरिक नाताळ व नव्या वर्षाच्या जल्लोषात मग्न होते आणि आम्हाला शेवटच्या क्षणी तिकीट विक्रीची आशा आहे.’ दुसरा टी२० सामना ७ जानेवारी रोजी इंदूरला, तर तिसरा व अंतिम सामना १० जानेवारी रोजी पुण्यामध्ये खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
श्रीलंका संघ : लसिथ मलिंगा (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसाल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, इसुरू उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदू हसरंगा, लाहिरू कुमार, कुसाल मेंडिस, लक्षण संदाकन व कासून राजिता.
Web Title: Sri Lanka team arrives in Guwahati; Practicing from Friday for T-1 series against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.