Join us

श्रीलंका संघ आधीच्या तुलनेत शानदार: शेफाली वर्मा; केवळ चमारी अट्टापट्टूवर अवलंबून नाही

भारतीय महिलांना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पुढील सामन्यात आशिया चॅम्पियन श्रीलंकेविरुद्ध भिडायचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2024 10:23 IST

Open in App

दुबई : ‘श्रीलंका संघाला कमी लेखून अजिबात चालणार नाही. त्यांचा संघ सध्या चांगल्या लयीत आहे. श्रीलंकेचा संघ आधीच्या तुलनेत खूप शानदार झाला असून हा संघ आता केवळ चमारी अट्टापट्टूवर अवलंबून नाही’, असे भारताची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिने सांगितले. 

भारतीय महिलांना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पुढील सामन्यात आशिया चॅम्पियन श्रीलंकेविरुद्ध भिडायचे आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत अपराजित राहिल्यानंतर भारताला अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्धच अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीनंतर भारताला १३ ऑक्टोबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करायचे आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हे दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. 

शेफालीने म्हटले की, ‘याआधी, श्रीलंकेकडून चमारी अधिक धावा काढायची आणि बळीही घ्यायची; परंतु आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेने एक संघ म्हणून दमदार कामगिरी केली. त्यामुळेच ते आशिया चषक पटकावण्यात यशस्वी ठरले.’ 

इंग्लंडचा सलग दुसरा विजय

महिला टी-२० विश्वचषकात एकतर्फी झालेल्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा सात बळींनी पराभव करत सलग दुसरा विजय साजरा केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ६ बाद १२४ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक ठेवत  तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण  केले. १५ धावांमध्ये २ बळी घेणारी सोफी एक्लेस्टोन सामन्याची मानकरी ठरली.

अरुंधतीला आयसीसीने फटकारले

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात अरुंधती रेड्डीने निदा दारला बोल्ड केले होते. त्यानंतर तिने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले. पाक बॅटरला अरुंधतीने खुन्नस दिली. हातवारे करत निदा दारला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या प्रकरणात आयसीसीने अरुंधतीला लेवल १ कोड ऑफ कंडक्टअंतर्गत दोषी ठरवले आहे. ती आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत दोषी आढळली. या प्रकरणात अरुंधतीच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा झाला आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट