गॉल, दि. 28 - भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पहिला डाव 291 धावात संपुष्टात आल्यानंतर भारताला श्रीलंकेवर फॉलोऑन लादण्याची संधी होती. पण कर्णधार कोहलीने फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. भारताकडे 309 धावांची भक्कम आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 600 धावा केल्या होत्या. एजलो मॅथ्यूज(83), थरंगा (64) आणि परेरा नाबाद (92) या तिघांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांनी नांगी टाकली.
भारताने पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर श्रीलंकेला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कसोटीच्या दुस-यादिवशी गुरुवारी श्रीलंकेचा संघ बॅकफुटवर ढकलला गेला. लंकेची दुस-या दिवसअखेर ५ बाद १५४ धावा अशी अवस्था झाली होती. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन श्रीलंकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. शामी, जाडेजाने तीन, उमेश यादवने दोन तर, अश्विन आणि पांडयाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताने पहिल्या डावात एव्हरेस्ट उभारताना श्रीलंकेमध्ये दुस-या क्रमांकाची आपली सर्वोत्तम धावसंख्या रचली. गुरुवारी ३ बाद ३९९ धावसंख्येवरून डाव पुढे सुरु केल्यानंतर भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे स्थिरावलेले फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पुजारा दुस-या दिवशी आपल्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ ९ धावांची भर घालून तंबूत परतला. त्याने २६५ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकारांसह एकूण १५३ धावांची खेळी केली. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने १३० चेंडूत ३ चौकारांसह ५७ धावा केल्या.
यानंतर आश्विन (६० चेंडूत ४७ धावा), कसोटी पदार्पण करणारा हार्दिक पांड्या (४९ चेंडूंत ५० धावा) आणि मोहम्मद शमी (३० चेंडूत ३० धावा) यांच्या मोलाच्या योगदानामुळे भारताने सहाशेचा आकडा गाठला. पांड्याने जबरदस्त खेळी करताना आपल्या पहिल्याच सामन्यात छाप पाडली. त्याने ५ चौकार व ३ षटकारांसह आपली खेळी सजवली. श्रीलंकेकडून नुवान प्रदीपने चमकदार मारा करताना १३२ चेंडूत ६ बळी घेतले. लाहिरु कुमारानेही १३१ चेंडूत ३ बळी घेत चांगला मारा केला.