श्रीलंकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगाने नुकतीच आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशविरुद्धची मालिका ही त्याची अखेरची वन डे मालिका ठरली. पुढील वर्षी होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून मलिंगाने ही निवृत्ती जाहीर केली. 2010मध्ये मलिंगा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यानं कसोटीत 30 सामन्यांत 101 विकेट्स, तर वन डेत 226 सामन्यांत 338 विकेट्स घेतल्या आहेत. एकिकडे मलिंगा पर्व शेवटाच्या दिशेनं वाटचाल करत असताना श्रीलंकेत आता नवा मलिंगा तयार झाला आहे. कोण आहे तो?
श्रीलंकेत सुरू असलेल्या एका क्रिकेट स्पर्धेत हा नवा मलिंगा सापडला आहे. त्याची गोलंदाजी हुबेहुब मलिंगासारखीच आहे. त्यामुळे आगामी काळात या युवा मलिंगाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. मथीशा पथिराना असे या 17 वर्षीय गोलंदाजाचे नाव आहे. त्रिनिटी कॉलेजचे तो प्रतिनिधित्व करतो आणि कॉलेजकडून पदार्पणाच्या सामन्यात त्यानं सात धावांत 6 विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेण्यास भाग पाडले आहे.