SL vs AFG Live | कोलंबो: सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काही नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यामुळे सामना चांगलाच चर्चेत आला. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ घोरपडीमुळे काही काळ थांबवावा लागला. राजधानी कोलंबोमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी खेळली जात आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात अफगाणिस्तानने १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंकेने चांगली खेळी करत आघाडी घेतली.
श्रीलंकेसाठी सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी केली आणि दिनेश चंडिमलने मॅथ्यूजला चांगली साथ दिली. शनिवारी या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ फलंदाजी करत असताना एक विचित्र घटना घडली. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला.
खरं तर श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ४७ व्या षटकात अफगाणिस्तानचा गोलंदाज निजात अँजेलो मॅथ्यूजला गोलंदाजी करत असताना सीमारेषेजवळ एक घोरपड दिसली. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने घोरपड पाहताच याची माहिती पंचांना दिली. यानंतर काही काळ खेळ थांबवण्यात आला. घोरपड तिथून गेल्यानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झाला.
दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या डावात केलेल्या १९८ धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेकडून सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि निशान मदुष्का यांनी चांगली सुरुवात करून दिली. मॅथ्यूजने शतक झळकावून पाहुण्या संघाची अडचण वाढवली.