टीम इंडिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यात जे जमलं नाही ते उस्मान ख्वाजानं श्रीलंकेत एका डावात करून दाखवलं. टीम इंडिया विरुद्ध १० डावात फक्त १८४ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन बॅटरनं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतकाला गवसणी घालत नवा इतिहास रचला. पहिल्या द्विशतकासह तो श्रीलंकेत अशी कामगिरी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. त्याची ही खेळी बुमराहवरचा राग श्रीलंकेच्या गोलंदाजावर काढल्यासारखीच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहनं केली होती बिकट अवस्था;
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत उस्मान ख्वाजा अडखळत खेळताना दिसला होता. बुमराहसमोर तर त्याची अवस्था खूपच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. सिडनीच्या अखेरच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला. दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजी केली नाही. या डावात त्याला थोडा दिलासा मिळाला होता. सिडनी कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने ४५ चेंडूत ४१ धावांची खेळी केली होती. टीम इंडियाविरुद्ध ५ सान्यातील १० डावात त्याने २०.४४ च्या सरासरीनं फक्त १८४ धावा काढल्या होत्या.
२९० चेंडूत साजरे केलं कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात उस्मान ख्वाजानं २९० चेंडूत १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने द्विशतकाला गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या भात्यातून निघालेली ही सर्वोच्च खेळी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ट्रॅविस हेडसोबत ऑस्ट्रेलियन संघाची डावाला सुरुवात करणाऱ्या ख्वाजानं पहिल्या दिवसाप्रमाणे दुसरा दिवसही उत्तम फलंदाजी करत द्विशतकी खेळीसह हवा केली.
ज्या मैदानात एका दिवसांत दोन वेळा बाद होण्याची नामुष्की ओढावली तिथं द्विशतकासह रचला इतिहास
२०१६ मध्ये गालेच्या मैदानात उस्मान ख्वाजावर एका दिवसात दोन वेळा बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. उस्मान ख्वाजा फिरकीसमोर टिकू शकत नाही, अशी टिकाही त्याच्यावर झाली. पण यावेळी त्याने आपल्यातील धमक दाखवत लंकेच्या भूमीवर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेत पहिलं द्विशतक झळकवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. मालिकेआधी त्याच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यावर तो म्हणाला होता की, ऑस्ट्रेलिया संघाला माझी गरज नसेल तर मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईन.