Sri Lanka vs New Zealand, 2nd Test , न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) याने कसोटी कारकिर्दीतील १६ वे शतक झळकावले. गालेच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या २ धावा लागल्या असताना न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीनं सलामीवीर पथुन निसंका याला तंबूत धाडलं. त्यानंतर दिनेश चंडीमल याने करुणारत्नेच्या साथीनं संघाचा डाव सावरला.
दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
दिनेश चंडीमल आणि दिमुथ करुणारत्ने यांनी संघाचा डाव सावरताना १२२ धावांची भागीदारी केली. ही जोडी न्यूझीलंडच्या संघासाठी अगदी डोकेदुखी ठरत होती. रन आउटच्या रुपात करुणारत्ने आउट झाला अन् श्रीलंकेच्या संघाला त्याच्या रुपात दुसरा धक्का बसला. करुणारत्ने याने १०९ चेंडूचा सामना करताना ४ चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या.
दिनेश चंडीमलची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी
दिनेश चंडीमल याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकाला गवसणी घालताच दिग्गज स्टार सनथ जयसूर्या याच्या विक्रमाशी बरोबरी केली. श्रीलंकेच्या संघाकडून सर्वाधिक वेळा ५० + धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिनेश चंडीमल हा पाचव्या स्थानावर आहे. ४५ व्या वेळी त्याने हा पराक्रम करून दाखवला आहे. जयसूर्यानं देखील कसोटीत ४५ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
श्रीलंकेकडून सर्वाधिक वेळा ५० + धावा करणारे फलंदाज
श्रीलंकेच्या संघाकडून कसोटी सर्वाधिक वेळा ५० + धावा करण्याचा विक्रम हा कुमार संगकाराच्या नावे आहे. ९० वेळा त्याने हा पराक्रम करून दाखवला आहे. त्यापाठोपाठ महेला जयवर्धनेचा नंबर लागतो. त्याने ८४ वेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे. अँजेलो मॅथ्यूज ५९, दिमुथ करुणारत्ने ५५, तर दिनेश चंडीमल आणि जयसूर्या यांनी ४५ वेळा कोसोटीत ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
गालेच्या मैदानात बहरदार खेळीचा रेकॉर्ड
गाले स्टेडियमवर चंडीमलची कामगिरी एकदम झक्कास राहिली आहे. या मैदानात खेळताना ३८ व्या डावात त्याने ६ व्या शतकाला गवसणी घातली. इथं त्याने ५७.३ च्या सरासरीनं १ हजार ७२० धावा काढल्या आहेत. ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे.