Sri Lanka vs New Zealand 2nd Test: श्रीलंकेच्या संघाने गाले स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात पाहुण्या किवी संघाला अवघ्या ८८ धावांत गारद केले. प्रभात जयसूर्याच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. या फिरकीपटूनं न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ४२ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून नवव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या मिचेल सँटनरनं ५१ चेंडूत २९ धावांची केली. जी न्यूझीलंडच्या ताफ्यातील फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली.
प्रभात जयसूर्याची कमालीची गोलंदाजी; शानदार 'सिक्सर'सह नवव्यांदा मारला पंजा
गालच्या मैदानात प्रभात जयसूर्यानं आपल्या फिरकीची जादू दाखवून देत किवी गोलंजांना अक्षरश: नाचवलं. त्याने या सामन्यात ९ व्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम आपल्या नावे नोदंवला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या रुपात मोठा मासा त्याच्या गळाला लागला. ठराविक अंतराने एका मागून एक अशा सहा विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय पदार्पणाचा सामान खेळणाऱ्या निशान पेरिस याने ३ आणि असिथा फर्नांडोला एक विकेट मिळाली.
पहिल्या डावात ५०० प्लस आघाडीचा खास रेकॉर्ड
न्यूझीलंडच्या संघाला ८८ धावांवर ऑल आउट करत श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ५५४ धावांची आघाडी घेतली. या भक्कम आघाडीसह पाहुण्यांना त्यांनी फॉलोऑन देत पुन्हा एकदा बॅटिंगला बोलावलं. श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्यांदा पहिल्या डावानंतर ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. याआधी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ५८७ धावांची मोठी आघाडी घेतली होती. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावे आहे. इंग्लंडच्या संघाने १९३८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ७०२ धावांची आघाडी घेतली होती.
पहिल्या डावात उभारला धावांचा डोंगर
पहिली कसोटी सामना जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहुण्या संघासमोर धावांचा डोंगरच उभा केला होता. कामिंदु मेंडिस याने अनेक विक्रम प्रस्थापित करणारी १८६ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्य़ाशिवाय चंडिमल ११६ (२०८) आणि कुशल मेंडिस १०६(१४९) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने ५ बाद ६०२ धावांवर पहिला डाव घोषित केला होता.