कोलंबो - रशियात नुकत्याच पार पडलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जपानच्या पाठीराख्यांनी सामन्यानंतर स्टेडियमची केलेली साफसफाई सा-यांचे लक्ष वेधून गेली. या स्पर्धेत जपानचे आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर जपानच्या खेळाडूंनीही ड्रेसिंग रूम स्वच्छ करून रशियाचे आभार मानले होते. जपानचे चाहते आणि खेळाडूंचे जगभरात कौतुक झाले. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या वन डे क्रिकेट मालिकेतही अशीच स्वच्छता मोहीम पाहायला मिळाली.
श्रीलंकेला पेल्लेकेल येथे झालेल्या तिस-या वन डेत आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेने 78 धावांनी हा सामना जिंकला आणि 5 सामन्यांची मालिका 3-0 अशी खिशात घातली. या पराभवानंतर यजमानांचे पाठीराखे हताश होणे साहजिकच होते, परंतु त्यांच्याकडून स्टेडियमच्या स्वच्छतेची अपेक्षा कोणी केली नव्हती. स्टेडियमवर हजर असलेल्या काही युवकांनी सामना संपल्यानंतर सर्व कचरा गोळा केला. श्रीलंका क्रिकेटने आपल्या ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला.