नवी दिल्ली : भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत सध्या अराजकता माजली असून देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेटने आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) बुधवारी सूचित केले की देशातील आर्थिक आणि राजकीय संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या आशिया कपचे आयोजन करण्याच्या स्थितीत देश नाही. श्रीलंकेतील सध्याची स्थिती पाहता श्रीलंका क्रिकेटने लंका प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाला देखील स्थगिती दिली आहे.
श्रीलंका क्रिकेटचा मोठा खुलासाएसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका क्रिकेटने सूचित केले आहे त्यांच्या देशातील सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थिती पाहिली तर आशिया कपचे आयोजन करण्याची देशात स्थिती नाही. खासकरून परकीय चलनाचा विचार केला तर ६ देशांच्या संघाची ही मोठी स्पर्धा आयोजित करणे त्यांच्यासाठी सोयीचे नाही. तसेच एसएलसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की ते यूएई किंवा इतर कोणत्याही देशात या स्पर्धेचे आयोजन करू इच्छितात.
लवकरच होणार घोषणाआशिया कपचे आयोजन यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच श्रीलंका बोर्ड याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
"यूएई हा शेवटचा पर्याय नाही आहे, यासाठी आणखी कोणताही देश असू शकतो. यामध्ये भारताचा देखील समावेश असू शकतो कारण ACC आणि श्रीलंका क्रिकेटला स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी प्रथम संयुक्त अरब अमिराती बोर्डाच्या (UAE) अधिकाऱ्यांशी बोलणे आवश्यक आहे. अशी अधिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली.