Sri Lanka vs Oman : आयसीसी वन डे विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या ११व्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ओमानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. आशियाई किंग्ज श्रीलंकेने मोठा विजय मिळवून ओमानला पराभवाची धूळ चारली. वानिंदू हसरंगाने वनडेत सलग दुसऱ्यांदा पाच बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेच्या फिरकीपटूने ७.२ षटकांत केवळ १३ धावा देत ५ बळी घेऊन ओमानच्या फलंदाजीची कंबर मोडली. हसरंगाच्या फिरकीसमोर ओमानचा संघ अवघ्या ९८ धावांत गारद झाला.
श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ओमानची फलंदाजी फार काळ टिकू शकली नाही आणि ३०.२ षटकांत ९८ धावांत संघ सर्वबाद झाला. यादरम्यान वानिंदू हसरंगाने ५, तर लाहिरू कुमाराने तीन बळी घेतले. ओमानने दिलेल्या ९९ धावांचा पाठलाग आशियाई किंग्ज श्रीलंकेने सहज केला. फक्त १५ षटकांत एकही गडी न गमावता श्रीलंकेने छोटे लक्ष्य गाठले. ओमानच्या कर्णधाराने आपल्या कामगिरीने सर्वांना निराश केले. झिशान मकसूद आठ चेंडू खेळून केवळ १ धावा काढून बाद झाला.
श्रीलंकेचा मोठा विजय आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी शानदार सुरूवात केली अन् संघाला विजय मिळवून दिला. पथुम निसंका (३७) आणि डिमुथ करूणारत्ने (६१) धावा करून नाबाद परतले. अखेर श्रीलंकेने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. वानिदू हसरंगाला आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.