नवी दिल्ली : विश्वचषक पात्रता फेरीच्या १९व्या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने नवख्या स्कॉटलंडचा ८२ धावांनी पराभव केला. स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराने घेतलेला निर्णय योग्य ठरवत स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि श्रीलंकेला ४९.३ षटकांत २४५ धावांवर रोखले. पण, आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडची फलंदाजी ढासळली. संघाकडून ख्रिस ग्रीव्हज (५६) वगळता अन्य कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
दरम्यान, या विजयासह श्रीलंकेने महत्त्वाचे दोन गुण मिळवले आहेत. श्रीलंकेची सुरुवात काही खास झाली नव्हती. ४३ धावांवर दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पथुम निसांकाने ७५ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात चारिथ असलंकाने ६३ धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. तर मार्क वॅटने ३ आणि ग्रीव्हजने ४ बळी घेतले. महेश तिक्ष्णासह श्रीलंकेच्या इतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून स्कॉटलंडला १६३ धावांवर २९ षटकांत सर्वबाद केले.
पथुम निसांकाने वन डेत गाठला १ हजार धावांचा टप्पा पथुम निसांकाने श्रीलंकेसाठी ५० चेंडूत आपल्या वन डे कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ८८.२४ होता. निसांकाने वन डे कारकिर्दीतील तिसाव्या डावात १००० धावांचा आकडा गाठला.