Join us  

श्रीलंकेला दुखापतीचे ग्रहण, हा दिग्गज खेळाडू तिसऱ्या कसोटीतून बाहेर

भारताविरोधातील तीन कसोटी सामन्याची मालिका 2-0 ने गमावली असताना श्रीलंकेच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 5:51 PM

Open in App

पल्लेकेले, दि. 8 : भारताविरोधातील तीन कसोटी सामन्याची मालिका 2-0 ने गमावली असताना श्रीलंकेच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. पहिल्या कसोटीपासूनच यजमान संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. पहिल्या कसोटीतून कर्णधार दिनेश चंडीमल बाहेर गेला होता. असेला गुणरत्ने, सुरंगा लकमल आणि नुवान प्रदीप हे तिन्ही दिग्गज दुखापतीमुळे याआधीच मालिकेबाहेर गेले आहेत. यात भर म्हणून की काय 12 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यातून अनुभवी गोलंदाज रंगना हेरथ बाहेर पडला आहे. पाठीच्या त्रासामुळे त्यानं शेवटच्या सामन्यातून माघार घेतली आहे. हेरथला गॉल कसोटीतच दुखापत झाली होती. मात्र कोलंबो कसोटीसाठी तो फीट झाला. मात्र आता तिसऱ्या कसोटीला दुखापतीमुळे हेरथला मुकावं लागणार आहे.श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारताने यापूर्वीच 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. त्यातच आता श्रीलंकेचा सर्वात महत्वाचा गोलंदाज संघात नसल्याने भारताकडे पुन्हा एकदा विजयाची संधी आहे. पहिल्या कसोटीत भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि 53 धावांनी विजयाची नोंद केली. मालिकेतील तिसरी कसोटी जिंकून विजयी शेवट करण्याच्या इराद्यानं लंकेचा संघ मैदानात उतरेल. तर भारतीय संघ राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यात आहे. त्यातच जडेजावर एका कसोटी समन्याती बंदी घातल्यामुळे अखेरच्या सामन्यात एका राखीव खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहली अजिंक्य रहाणे, उमेश यादवला आराम देऊन रोहित शर्माला आणि भुवनेश्वर कुमारलाही खेळवू शकतो.