नवी दिल्ली : वेळेसमोर कोणाचे काहीच चालत नाही असे बोलले जाते. कोणावर कधी कोणती वेळ येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय क्रिकेटमधून समोर आला आहे. अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. मात्र, त्यांच्या कारकिर्दीचा अंत चांगला झाला नाही. भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे शतक रोखणाऱ्या फिरकीपटूला आज ऑस्ट्रेलियात बस चालवावी लागत आहे. फिरकीपटू सूरज रणदीवला (Suraj Randiv) एक दशकापूर्वी त्याच्या फिरकीमुळे चर्चेत असायचा. परंतु, त्याच्या साथीदाराच्या प्रभावाखाली येऊन चीटिंग केल्याने त्याची कारकिर्द संपुष्टात आली.
दरम्यान, वीरेंद्र सेहवाग 2010 मध्ये वन डे मालिका खेळत होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो 99 धावांवर फलंदाजी करत होता. खरं तर वीरू चांगल्या लयीत होता आणि त्याला शतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती. भारतीय संघालाही विजयासाठी तेवढ्याच धावांची गरज होती. सर्वांच्या नजरा सेहवागवर होत्या, पण श्रीलंकेचा फिरकीपटू सूरज रणदीवने आपल्या सहकारी खेळाडूच्या प्रभावाखाली येऊन नो बॉल टाकला, ज्यावर सेहवागने षटकार ठोकला पण ही धाव त्याच्या खात्यात जमा झाली नाही. भारताने सामना जिंकला पण सेहवागला 99 धावांवर नाबाद परतावे लागले.
तिलकरत्ने दिलशानच्या सांगण्यावरून केलं कृत्य
रणदीवने हे काम तिलकरत्ने दिलशानच्या सांगण्यावरून केले असल्याचे तेव्हा सांगितले गेले. मात्र, नंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर एका सामन्याची बंदी देखील घातली होती. दोन वर्षांपूर्वी सूरज रणदीवचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते ज्यात तो बस चालवताना दिसत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेचा हा फिरकीपटू ऑस्ट्रेलियात बस चालवतो आणि तो स्थानिक क्लबकडून क्रिकेटही खेळतो.
चॅम्पियन CSKचा हिस्सा होता सूरज रणदीव
सूरज रणदीव 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाला पोहोचला. एप्रिल 2019 मध्ये त्याने शेवटचा देशांतर्गत सामना खेळला होता. रणदीव 2011 च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा रणदीव देखील एक भाग होता. या फिरकीपटूने श्रीलंकेसाठी 12 कसोटी, 31 वन डे आणि 7 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 43 तर वन डे सामन्यांत 36 बळी घेतले आहेत. रणदीवने ट्वेंटी-20 मध्ये 7 बळी घेतले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sri Lankan spinner Suraj Randiv, who cheated Virender Sehwag and missed out on a century, has now become a bus driver in Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.