कटक - येथे सुरु असेलल्या पहिल्या टी -20 सामन्यामध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात श्रीलंकेचे फलंदाज अडकले. भारतीय संघानं केलेल्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारतानं 93 धावानं विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा हा टी-20 च्या इतिहासातीस सर्वात मोठा विजय आहे.
भारताने उभारलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना लंकेचा डाव १६ षटकांत केवळ ८७ धावांत संपुष्टात आला. युझवेंद्र चहल (४/२३), हार्दिक पांड्या (३/२९) यांनी अचूक मारा करत लंकेची दाणदाण उडवली. चहलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.बाराबती स्टेडियमवर लंकेने आक्रमक सुरुवात केली खरी, मात्र जयदेव उनाडकटने निरोशन डिकवेला (१३) याला बाद करून लंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर ठराविक अंतराने लंकेचे फलंदाज बाद झाले. अनुभवी सलामीवीर उपुल थरंगा याने १६ चेंडंूत एक चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक २३, तर कुशल परेराने २८ चेंडूत १९ धावांची खेळी केली. याशिवाय, अँजेलो मॅथ्यूज (१), असेला गुणरत्ने (५), दासून शनाका, थिसारा परेरा (३) हे सपशेल अपयशी ठरले. चहल व हार्दिक यांनी भेदक मारा करत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तत्पूर्वी, सलामीवीर लोकेश राहुलचे (६१) शानदार अर्धशतक व महेंद्रसिंग धोनी - मनीष पांडे यांची नाबाद अर्धशतकी भागीदारी या जोरावर भारताने ३ बाद १८० धावांची मजल मारली. राहुल अर्धशतक झळकावून बाद झाल्यानंतर धोनी - पांडे यांनी ६८ धावांची नाबाद भागीदारी करून भारताला मजबूत धावसंख्या उभारली. मॅथ्यूजने कर्णधार रोहित शर्माला (१७) बाद करून भारताला ५व्या षटकात मोठा धक्का दिला. यानंतर लोकेश राहुलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत ४८ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६१ धावांची निर्णायक खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसह (२४) दुसºया विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. अय्यर व राहुल ११ धावांच्या फरकाने बाद झाल्यानंतर धोनी - पांडे यांनी लंका गोलंदाजीचा समाचार घेतला. (वृत्तसंस्था)धोनीने २२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ३९, तर पांडेने १८ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३२ धावांचा तडाखा दिला. डावातील अखेरच्या चेंडूूवर धोनीने उत्तुंग षटकार ठोकत भारताची धावसंख्या १८० वर नेली.धोनी-पांडे यांनी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत लंका गोलंदाजीचा घाम काढला. श्रीलंकेकडून मॅथ्यूज, थिसारा परेरा आणि नुवान प्रदीप यांनी प्रत्येकी एक बळी घेण्यात यश मिळवले.धावफलक : भारत : रोहित शर्मा झे. चमीरा गो. मॅथ्यूज १७, लोकेश राहुल त्रि. गो. परेरा ६१, श्रेयस अय्यर झे. डिकवेला गो. प्रदीप २४, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३९, मनीष पांडे नाबाद ३२. अवांतर - ७. एकूण : २० षटकांत ३ बाद १८० धावा.गोलंदाजी : विश्वा फर्नांडो २-०-१६-०; अकिला धनंजय ४-०-३०-०; दुशमंथा चमीरा ३-०-३८-०; अँजेलो मॅथ्यूज ३-०-१९-१; थिसारा परेरा ४-०-३७-१; नुवान प्रदीप ४-०-३८-१.श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. राहुल गो. उनाडकट १३, उपुल थरंगा झे. धोनी गो. चहल २३, कुशल परेरा झे. धोनी गो. कुलदीप १९, अँजेलो मॅथ्यूज झे. व गो. चहल १, असेल गुणरत्ने यष्टीचीत धोनी गो. चहल ५, थिसारा परेरा यष्टीचीत धोनी गो. चहल ३, अकिला धनंजय झे. व गो. हार्दिक ७, दुष्मंथा चमीरा झे. राहुल गो. हार्दिक १२, विश्वा फर्नांडो नाबाद २, नुवान प्रदीप झे. उनाडकट गो. हार्दिक ०. अवांतर - १. एकूण : १६ षटकांत सर्वबाद ८७ धावा.गोलंदाजी : हार्दिक पांड्या ४-०-२९-३; जयदेव उनाडकट २-०-७-१; युझवेंद्र चहल ४-०-२३-४; जसप्रीत बुमराह २-०-१०-०; कुलदीप यादव ४-०-१८-२.