नागपूर - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु झालेल्या दुस-या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा पहिला डाव 205 धावांवर संपुष्टात आणला. भारताची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. दिवसअखेर भारताच्या एक बाद 11 धावा झाल्या आहेत.
मुरली विजय नाबाद (2) आणि चेतेश्वर पूजारा नाबाद (2) यांची जोडी मैदानावर आहे. लोकेश राहुलला (7) धावांवर गामाजेने क्लीनबोल्ड केले. उद्या भारताच्या आघाडीच्या फळीकडून मोठया खेळीची अपेक्षा आहे. श्रीलंकेकडून सलामीवीर करुणारत्ने (51) आणि कर्णधार चंडीमल (57) या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजी मोठी खेळी करु शकले नाहीत.
श्रीलंकेच्या डावात या दोघांनीच अर्धशतके फटकावली. भारताकडून इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाने भेदक मारा केला. अश्विनने सर्वाधिक चार तर इशांत आणि जाडेजाने प्रत्येकी तीन गडी बाद केले. श्रीलंकेविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर नागपुरात दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आपलं विजयी खातं उघडण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इच्छुक आहे. कोलकातामध्ये झालेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. भारत विजयाच्या अत्यंत जवळ पोहोचला होता, मात्र कमी प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि विजय भारताच्या हातातून निसटला.
भारताकडून या कसोटीसाठी संघात तीन बदल करण्यात आले आहेत. शिखर धवनने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतल्यामुळे मुरली विजयला संधी मिळाली असून भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत ईशांत शर्माने पुनरागमन केलं आहे. ईशांत सध्याच्या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असून, तो ७७ कसोटी सामने खेळला आहे. मोहम्मद शामी जखमी झाला असून त्याच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे.