IPL 2024, KKR: आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. महिला प्रीमिअर लीगचा हंगाम पार पडल्यानंतर आयपीएलचा थरार रंगणार आहे. यासाठी सर्वच फ्रँचायझी कामाला लागल्या आहेत. अशातच कोलकाता नाईट रायडर्सने आगामी हंगामासाठी श्रीलंकेच्या घातक गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले आहे. केकेआरने इंग्लंडच्या गस ऍटकिन्सनची रिप्लेसमेंट म्हणून श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराला संघात घेतले आहे. त्यामुळे मिचेल स्टार्कला तगडा सहकारी मिळाल्याचे बोलले जात आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात केकेआरच्या फ्रँचायझीने ऐतिहासिक बोली लावून स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतले.
चमीराला ५० लाख रूपयांच्या मूळ किंमतीत केकेआरने खरेदी केले आहे. त्याला त्याच्या गोलंदाजीच्या गतीसाठी ओळखले जाते. स्विंग आणि सीमच्या हालचालींनी फलंदाजांना अडचणीत आणणारा चमीरा आता केकेआरच्या संघाचा भाग झाला आहे. त्याने अनुक्रमे २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले. २०२२ च्या हंगामात त्याने लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केले, जिथे त्याने १२ सामन्यांमध्ये नऊ बळी घेतले.
मिचेल स्टार्कवर तब्बल २४.७५ कोटींचा वर्षावकेकेआरच्या फ्रँचायझीने मागील वर्षी पार पडलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.