कोलंबो, दि. 14 - पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिस-या कसोटीतही भारताने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत श्रीलंकेचे पुरते वस्त्रहरण झाले असून, भारताने तिसरी कसोटी 1 डाव 171 धावांनी जिंकली. भारताने कसोटी मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. या कसोटी विजयासह भारताने एक नवीन इतिहास रचला आहे. भारताने विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकले आहेत. आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताने प्रथमच परदेशात अशा प्रकारची कामगिरी केली आहे.
भारताच्या भेदक मा-यापुढे श्रीलंकेचा दुसरा डाव आटोपला. फॉलोऑनच्या दबावाखाली खेळणा-या श्रीलंकन संघातील एकही फलंदाज तिस-या दिवशी मोठी खेळी साकारु शकल नाही. दिनेश चंडीमल (36), अॅजलो मॅथ्यूज (35) आणि डीकवेलाने (41) धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. दुस-या डावात मॅथ्यूज आणि चंडीमलमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेली 65 धावांची पार्टनरशिप ही श्रीलंकेची सर्वात मोठी भागीदारी ठरली.
तिस-या दिवशी सलामीवीर करुणारत्नेच्या (16) रुपाने श्रीलंकेची पहिली विकेट गेली. अश्विनने त्याला रहाणेकरवी झेलबाद केले. त्यानंतर शामीने पुष्पकुमारा आणि मेंडिसला लागोपाठ बाद करुन श्रीलंकेचा डाव अडचणीत आणला. 39 धावात चार विकेट गेल्यानंतर मॅथ्यूज आणि चंडीमलने डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटासाठी 65 धावांची भागीदारी केली. पण चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने चंडीमलला (35) बाद करुन ही जोडी फोडली.
त्यानंतर काही धावांच्या अंतराने अश्विनने मॅथ्यूजला (35) पायचीत पकडले. खेळपट्टीवर जम बसवलेल्या डीकवेलाला (41) उमेश यादवने रहाणेकरवी झेलबाद केले. हे तिघे बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या शेपटाला गुंडाळायला भारतीय गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. अश्विन आणि शामीने प्रत्येकी तीन तर, उमेश यादवने दोन तर, कुलदीप यादवने एक विकेट घेतला.
हार्दिक पांड्या भविष्यातला कपिल देव, मुख्य निवडकर्त्यांनी उधळली स्तुतीसुमनं
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची बॅट चांगलीच तळपली. याशिवाय एक गडी बाद करून त्याने आपली गोलंदाजीतली चमकही दाखवली. या सामन्यात त्याने अनेक विक्रमही मोडित काढले. तुफानी फटकेबाजी करत या सामन्यात हार्दिकने कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक फटकावलं. हार्दिक पांड्याने 96 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह फटकावलेल्या 108 धावांमुळे भारताने पहिल्या डावात 487 धावा ठोकल्या. या धमाकेदार खेळीमध्ये पांड्याने एका षटकात तब्बल 26 धावा कुटल्या. यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्याच्या या धमाकेदार खेळीचं भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी कौतूक केलं आहे. पांड्यावर स्तुतीसुमनं उधळताना त्याच्या भविष्यातला कपिल देव बनण्याची क्षमता असल्याचं प्रसाद म्हणाले.
Web Title: Sri Lanka's innings collapsed, a strong grip on India's Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.