World Test Championship final : श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर १ डाव व ३९ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने ५५४ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १५१ धावांवर गुंडाळून सामना १ डाव व ३९ धावांनी जिंकला. पदार्पणवीर प्रभात जयसूर्याने दोन्ही डावांत मिळून १२ ( ६/११८ व ६/५९) विकेट्स घेतल्या आणि त्याला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. श्रीलंकेने या विजयासह भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांना धक्का दिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सुधारित क्रमवारीत श्रीलंकेने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे आणि आता तेही WTC 23 Final च्या शर्यतीत आले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पराभव हा भारतीय संघाता आधीच महागात पडला होता. त्यात श्रीलंकेच्या मुसंडीने त्यांच्या फायनलच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे. भारताची पाचव्या , तर पाकिस्तानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर भारताचे २ गुण कापले गेले होते आणि त्यामुळे पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर सरकला होता.दक्षिण आफ्रिकेचा संघ ७१.४३ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया ( ७० टक्के) व श्रीलंका ( ५४.१७ टक्के) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताची टक्केवारी ५२.०८ इतकी आहे आणि त्यांना आता बांगलादेशविरुद्धच्या दोन ( परदेशात) व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार ( घरच्या मैदानावर) कसोटी मालिका जिंकाव्या लागतील. तरच ते फायनलमध्ये प्रवेश करू शकतील.