कोलंबो - श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना मलिंगाचा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील अखेरचा सामना ठरला. या सामन्यात बांगलादेशवर मात करत श्रीलंकेने लसिथ मलिंगाला विजयासह गोड निरोप दिला. मलिंगाने २२६ वनडे सामन्यांमध्ये ३३८ बळी मिळवून एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला.
मलिंगाने अखेरच्या सामन्यात देखील गोलंदाजीत अचूक मारा करत 3 गडी बाद केले. तसेच कुशल परेराने साकारलेल्या शतकी खेळीमुळे श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर ९१ धावांनी विजय मिळवला. या नेत्रदीपक कामगिरीसाठी मलिंगाला सामनावीर देण्यात आला.
सामन्याआधी बोलताना मलिंगा म्हणाला कि, ‘या वेळी निवृत्ती घेताना मला आनंद वाटत आहे. ही नवीन खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची आणि पुढील विश्वचषकासाठी तयारी करण्याची संधी आहे. युवा खेळाडूंना विश्वास ठेवण्याची गरज आहे की ते चांगली कामगिरी करु शकतात. आम्ही काही धक्के नक्कीच खाल्ले पण आमच्याकडे विश्वचषक जिंकण्याती क्षमता असल्याचे त्याने स्पष्ट केले.
मलिंगाने त्याच्या वनडे कारकिर्दीत 226 सामन्यात 338 विकेट्स घेतल्या. तसेच सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळेला देखील त्याने मागे टाकले. त्याचप्रमाणे श्रीलंकेसाठी वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. श्रीलंकेकडून त्याच्यापेक्षा केवळ मुथय्या मुरलीधरन(523) आणि चामिंडा वास(399) यांनी अधिक वनडे विकेट्स घेतल्या आहेत.