दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं जेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला ८ गडी राखून पराभूत केलं आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. याआधी ऑस्ट्रेलियानं तब्बल पाचवेळा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला आहे, तर दोनवेळा चॅम्पियन्स करंडक पटकावला आहे. गेल्या सहा टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियानं लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र यंदा ऍरॉन फिंचच्या संघानं दमदार कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. त्यात एका भारतीय व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली त्यावेळी भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र पाकिस्तान, न्यूझीलंडनं भारताला धक्का दिला. त्यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. मात्र एका भारतीयाचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्या भारतीयाचं नाव आहे श्रीधरन श्रीराम.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये श्रीराम यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते ऑस्ट्रेलियन संघाचे असिस्टंट कोच आहेत. २०१५ मध्ये स्पिन बॉलिंग असिस्टंट म्हणून ते ऑस्ट्रेलियन संघासोबत जोडले गेले. त्यांचं काम ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आणि बोर्डाला आवडलं. त्यामुळे त्यांना असिस्टंट कोच म्हणून जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी अतिशय उत्तमपणे पार पडली.
श्रीराम यांनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कोचिंग स्टाफचे सदस्य म्हणून केलं आहे. तिथे त्यांच्यावर बॅटिंग आणि बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी होती. श्रीराम भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. आठ एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर ८१ धावा आहेत. मात्र प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी शानदार झाली आहे. १३३ सामन्यांत त्यांच्या नावावर ९ हजार ५३९ धावा आहेत. त्यात ३२ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.