CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना थरारक रंगला. स्टार खेळाडू अपयशी ठरले असताना २३ वर्षाच्या डॉमिनिक ड्रॅक्स ( Dominic Drakes) यानं अखेरच्या चेंडूपर्यंत खिंड लढवली आणि ड्वेन ब्राव्होच्या सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts and Nevis Patriots) संघाला थरारक विजय मिळवून दिला. पॅट्रीओट्सनं CPL 2021 Final मध्ये सेंट ल्युसिया किंग्सवर ( ST LUCIA KINGS) संघावर ३ विकेट्स राखून हा विजय मिळवला. त्यांचे हे पहिलेच CPL जेतेपद आहे. ब्राव्होच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पॅट्रीओट्सनं इतिहास रचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात चैतन्य पसरले आणि त्यांनी ट्विट करून त्यांचा आनंद व्यक्त केला. कारण जेतेपदासोबतच ब्राव्होनं मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
अँद्रे फ्लेचरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ल्युसिया किंग्सनं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५९ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिसचे न खेळणे त्यांना महागात पडले. दुखापतीमुळे ड्यु प्लेसिस सलग तीन सामने खेळला नाही आणि ही गोष्ट CSKच्याही चिंतेत भर टाकणारी आहे. पण, रहकीम कोर्नवॉल व रोस्टन चेस यांनी फटकेबाजी केली. कोर्नवॉलनं ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ४३, तर चेसनंही ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ४३ धावा केल्या. किमो पॉलनं २१ चेंडूंत ५ षटकारांसह ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पॅट्रीओट्सच्या फवाद अहमद व नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात, पॅट्रीओट्सचे ख्रिस गेल, एव्हीन लुईस व कर्णधार ड्वेन ब्राव्हो एकेरी धाव करून माघारी परतले. जोशुआ डा सिल्वाह ( ३७) व शेर्फान रुथरफोर्ड ( २५) यांनी मधल्या फळीत संघर्ष केला, परंतु तरीही पॅट्रीओट्सचा विजय अशक्य वाटत होता. मात्र, २३ वर्षीय डॉमिनिक सुसाट खेळला. त्याला फॅबिन अॅलन (२०) ची साथ मिळली. डॉमिनिकनं २४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ४८ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत त्यानं पॅट्रीओट्सला पहिले CPL जेतेपद जिंकून दिले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५ फायनल जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये किरॉन पोलार्डच्या सोबतीला आता ड्वेन ब्राव्होही आला आहे.