मेलबोर्न : आगामी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे भवितव्य अद्यापही अधांतरीच आहे. १० जूनला आयसीसीच्या बैठकीत विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल चर्चा झाली.पण कोणताही ठोस निर्णय न घेता जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलली. दरम्यानच्या काळात टी-२० विश्वचषक आणि २०२१ मधील महिला क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनासाठी काही पर्याय उपलब्ध होतात का, याबद्दल आयसीसी विचार करणार आहे. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे हे जवळपास अशक्य असल्याची कबुली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स यांनी मंगळवारी दिली.‘आॅस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन यंदा करणे हे सध्या तरी शक्य आहे, असे दिसत नाही. ही स्पर्धा अद्याप रद्द करण्यात आलेली नाही किंवा पुढेदेखील ढकलण्यात आलेली नाही.कोरोनामुळे सध्या विश्वचषकात सहभागी होणाºया १६ संघांना येथे येणे शक्य होणार नाही. अनेक देश कोरोनाच्या तडाख्यातून अद्यापही सावरू शकलेले नाही. अशा परिस्थितीत १६ देशांना एकत्र आणणे हे खूपच कठीण काम आहे. आयसीसी यासंदर्भात बैठक आयोजित करणार आहे. त्यात बºयाच गोष्टीत बदल होण्याचीही शक्यता आहे,’ असे एडिंग्ज यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत.आॅस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीतटी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बोर्डाच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने, प्रत्येक घटकाच्या सुरक्षेचा विचार करून नवीन पर्याय शोधण्यावर आयसीसी बैठकीत एकमत झाले. त्यामुळे जुलै महिन्यातच विश्वचषकाच्या आयोजनावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)आयपीएल सप्टेंबरअखेर?टी-२० विश्वचषक आयोजनातून क्रिकेट आॅस्ट्रेलिया काढता पाय घेण्याची चिन्हे दिसताच बीसीसीआयने यंदा आयपीएलचे नियोजन सुरू केले असल्याची माहिती आहे. स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी बीसीसीआयने आयपीएल आयोजन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसापर्यंत करण्याची योजना आखली. २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर असे हे नियोजन असेल. आयसीसीने टी-२० विश्वचषकाचा निर्णय घेतल्यानंतरच अधिकृत घोषणा होऊ शकते. पायाभूत सुविधा, चार आंतरराष्ट्रीय स्टेडियम, प्रवासातील सुलभता आणि उच्चभ्रू हॉटेल्स या गोष्टी उपलब्ध असलेल्या शहरांची निवड आयपीएलसाठी केली जाईल. अनेक फ्रॅन्चायसींनी आयपीएलच्या पूर्ण आयोजनाची मागणी केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- CoronaVirus News: टी-२० विश्वचषक यंदा अशक्य; ऑस्ट्रेलियाची कबुली
CoronaVirus News: टी-२० विश्वचषक यंदा अशक्य; ऑस्ट्रेलियाची कबुली
आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 2:33 AM