Abu Dhabi T10 स्पर्धेच्या फायनलमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा ३७ धावांच्या फरकाने पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन ग्लॅडिएटर्सने 128 धावा केल्या, प्रत्युत्तरात न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने १० षटकांत ९१ धावा केल्या. डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या विजयात त्यांचा कर्णधार निकोलस पूरनचे (Nicolas Pooran) महत्त्वाचे योगदान होते. पूरनने केवळ फायनलमध्येच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत तुफानी कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या संघाचे कर्णधारपद जरी त्याने टी२० वर्ल्डकप नंतर सोडले असले तरी त्याने या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केले.
निकोलस पूरनचा तुफानी तडाखा
निकोलस पूरनने अंतिम सामन्यात २३ चेंडूत ४० धावांची खेळी केली. डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या कर्णधाराने या स्पर्धेत सर्वाधिक ३४५ धावा केल्या. निकोलस पूरनने T10 लीगमध्ये १४७ चेंडूत एकूण ३४५ धावा ठोकल्या. निकोलस पूरनने सरासरी ४९.२८ धावा केल्या. १० षटकांच्या स्पर्धेत अशी कामगिरी करणे आणि त्यात सातत्य राखणे साऱ्यांनाच भावले. या स्पर्धेत पूरनचा स्ट्राइक रेटदेखील २३४ पेक्षा जास्त होता. निकोलस पूरनने T10 लीगमध्ये सर्वाधिक २५ षटकार ठोकले. याशिवाय त्याने सर्वाधिक ३ अर्धशतकेही ठोकली.
निकोलस पूरननंतर दमदार कामगिरी कॅडमोरने केली. त्याने २८९ धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या बॅटमधून एकूण २० षटकारांची बरसात झाली. ऑस्ट्रेलियन नवखा खेळाडू टीम डेव्हिडनेही १६ षटकारांच्या मदतीने २२१ धावा कुटल्या. गोलंदाजीत ड्वेन प्रिटोरियसने १० सामन्यांत १२ बळी घेतले. जॉर्डन थॉम्पसनने देखील १२ विकेट घेतल्या. परंतु त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटकामागे १२.५५ धावांचा होता. प्रिटोरियसने मात्र फलंदाजांना पूरक अशा स्पर्धेत ९.८१च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. त्याने IPL मध्ये CSKकडून खेळताना आपला ठसा उमटवला होता.