Australia Women Team : ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ डिसेंबर-जानेवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने यष्टीरक्षक फलंदाज ॲलिसा हिलीला तिन्ही फॉरमॅटसाठी संघाचा नियमित कर्णधार बनवले आहे. याशिवाय ताहलिया मॅकग्राकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मेग लॅनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर हा बदल करण्यात आला. खरं तर ॲलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे.
दरम्यान, मोठ्या कालावधीपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाची धुरा मेग लॅनिंगच्या खांद्यावर होती. आगामी काळात ऑस्ट्रेलियन संघ हिलीच्या नेतृत्वाखाली पहिला भारत दौरा करणार असून त्याची सुरुवात २१ डिसेंबरपासून एका कसोटी सामन्याने होणार आहे. यानंतर दोन्ही संघ २८ डिसेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका आणि पाच जानेवारीपासून तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळतील.
स्टार्कच्या पत्नीने याआधी देखील संघाची कमान सांभाळली आहे. अंतरिम कर्णधार म्हणून तिने इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधारपद भूषवले आहे. याशिवाय उपकर्णधार बनलेल्या ताहलिया मॅकग्रानेही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कमान सांभाळली आहे. अॅलिसा हिली अनुपस्थित असताना तिने दोनदा संघाचे नेतृत्व केले आहे.
ॲलिसा हिलीचा अनुभव पाहता संघ व्यवस्थापनाने तिच्यावर ही जबाबदारी सोपवली. ती संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळते. हिलीने आतापर्यंत सात कसोटी, १०१ वन डे आणि १४७ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या १२ डावांमध्ये २८६ धावा करण्यात तिला यश आले, ज्यात दोन अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. याशिवाय वन डेमध्ये ८९ डावात फलंदाजी करताना तिने २७६१ धावा कुटल्या. वन डे मध्ये तिच्या नावावर पाच शतके आणि १५ अर्धशतकांची नोंद आहे. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्येही हिलीने शतक झळकावले आहे.